MGID Header Code
Code End

सोसायटीधारकांच्या समस्या, कायदेशीर प्रश्नांना मिळणार एकाच व्यासपीठावर उत्तर ; सोसायटी धारकांसाठी राबवण्यात येणार ‘सहकार दरबार’ उपक्रम


चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचा पुढाकार ; दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन,सल्ला व शंका-समाधान

मोशी : पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रशासकीय, कायदेशीर आणि दैनंदिन समस्यांवर प्रभावी मार्गदर्शन मिळावे, तसेच सोसायटी पदाधिकारी, व्यवस्थापन समिती आणि सभासदांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे एकाच व्यासपीठावर मिळावीत, या उद्देशाने चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने ‘सहकार दरबार’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ रविवार, दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यापुढे दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सहकार दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ आणि विविध विषयांतील मान्यवरांच्या उपस्थितीत सोसायटी प्रतिनिधींना मार्गदर्शन, सल्ला आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे.

सहकारी गृहनिर्माण संस्था अधिनियम १९६०, कलम ६१ आणि आदर्श उपविधी यासंदर्भातील माहिती, सोसायटीची देखभाल दुरुस्ती शुल्क (मेंटेनन्स) वसुली, सोसायटीच्या निवडणुका, सोसायटी व्यवस्थापन समितीची कर्तव्ये, सभासदांचे हक्क व कर्तव्ये या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

याशिवाय कन्व्हेयन्स डीड (Conveyance Deed), डिम्ड कन्व्हेयन्स (Deemed Conveyance), सोसायटी पुनर्विकास (Redevelopment), सोसायटीच्या दैनंदिन कामकाजात उद्भवणाऱ्या अडचणी, तसेच सभासद आणि व्यवस्थापन समिती यांच्यातील वादविवाद व तंटे यावरही योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विशेषतः आदर्श उपविधी, सहकार कायदे आणि उपविधींमधील तरतुदी यांची सविस्तर माहिती देऊन सोसायटी पदाधिकाऱ्यांना कायदेशीर बाबी समजावून सांगण्यावर भर दिला जाणार आहे.

सध्या शहरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सभासद आणि व्यवस्थापन समिती यांच्यातील मतभेद, मेंटेनन्स वसुली, निवडणूक प्रक्रिया, सभासदांचे अधिकार, कन्व्हेयन्स डीड, पुनर्विकास तसेच प्रशासकीय कामकाजाबाबत अनेक प्रश्न निर्माण होत असतात. अनेकदा योग्य माहितीअभावी सोसायट्यांना कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत सहकार दरबाराच्या माध्यमातून संबंधितांना योग्य दिशा मिळण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमामुळे केवळ सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनाच नव्हे, तर सर्वसामान्य सभासदांनाही सहकार कायदे, हक्क, कर्तव्ये आणि सोसायटी व्यवस्थापनाची प्रक्रिया समजून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहरातील विविध गृहनिर्माण संस्थांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या समस्या, प्रश्न आणि शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

सहकार दरबाराचे ठिकाण : चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे मध्यवर्ती कार्यालय, जाधववाडी सीएनजी पंपासमोर, सेक्टर १३, मोशी प्राधिकरण येथे हा उपक्रम पार पडणार आहे.

दरम्यान, फेडरेशनचे मध्यवर्ती कार्यालय नागरिकांच्या सोयीसाठी दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार असून, या वेळेत सोसायटीसंदर्भातील विविध प्रश्न व अडचणी मांडता येणार आहेत. शहरातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी, व्यवस्थापन समिती सदस्य आणि सभासदांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया : 

“पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना भेडसावणाऱ्या विविध कायदेशीर, प्रशासकीय आणि दैनंदिन समस्यांवर योग्य मार्गदर्शन मिळावे, तसेच सोसायटी पदाधिकारी व सभासदांना त्यांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव व्हावी, या उद्देशाने ‘सहकार दरबार’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांच्या माध्यमातून विविध विषयांवर मार्गदर्शन, सल्ला व शंका-समाधान केले जाणार आहे. हा उपक्रम केवळ प्रश्न मांडण्यापुरता मर्यादित न राहता सोसायट्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रभावी व्यासपीठ ठरेल. परिसरातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी, व्यवस्थापन समिती सदस्य आणि सभासदांनी या उपक्रमात सहभागी होऊन लाभ घ्यावा.”

- संजीवन सांगळे,

अध्यक्ष, चिखली- मोशी- चऱ्होली- पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन

थोडे नवीन जरा जुने