Alandi : आळंदीत महिला बचत गटांना २१ लाख बीज भांडवलाचे वाटप - मुख्याधिकारी खांडेकर

 


आळंदी नगरपरिषद सामाजिक बांधिलकी जोपासत उपक्रम 

आळंदी (अर्जुन मेदनकर ) : आळंदी नगरपरिषद अंतर्गत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना PMFME) अंतर्गत स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना एकूण सुमारे २१ लाख रुपये इतक्या रक्कमेचे विनातारण बीज भांडवलाचे वाटप सहा बचत गट मिळून उत्साहात करण्यात आल्याचे आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले. 

 आळंदी नगरपरिषद कार्यालयात महिला बचत गटांना बीज भांडवलाचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यअधिकरी बोलत होते. या प्रसंगी श्री स्वामी समर्थ शहर उपजीविका केंद्र अध्यक्षा सुवर्णा बंडूनाना काळे, आळंदी नगरपरिषद कार्यालयीन प्रमुख अर्चना भिसे, सहा. प्रकल्प अधिकारी वैशाली पाटील, समुदाय संघटक अर्जुन घोडे, सोनाली रत्नपारखी, महिला बचत गटांचे पदाधिकारी, महिला सदस्य, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी वृंद उपस्थित होते.

या बीज भांडवल वाटपात जागृती महिला बचत गट ३ लाख २० हजार रुपये, सरस्वती महिला बचत गट ३ लाख ६० हजार रुपये, अलंकापुरी महिला बचत गट ३ लाख ६५ हजार रुपये, संघर्ष महिला बचत गट ३ लाख ६५ हजार रुपये, तेजस्विनी महिला बचत गट ३ लाख २० हजार रुपये, इंदिरा महिला बचत गट ३ लाख ६० हजार रुपये बीज भांडवल वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला बचत गटांना उद्योजकतेस आर्थिक पाठबळ देऊन त्यांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने भक्कम पाऊल टाकण्याची संधी देण्यात आल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले. मुख्याधिकारी खांडेकर यांनी उपस्थित महिला बचत गटातील पदाधिकारी, महिलांना व्यवसाय विषयक मार्गदर्शन करीत सुसंवाद साधला. कुशाग्र संस्थेच्या गीता ताई यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्यांची विशेष उपस्थिती यावेळी मिळाली.  

“बीज भांडवल म्हणजे केवळ कर्ज नसून, महिलांच्या आत्मविश्वासाचा आणि स्वप्नपूर्तीचा पहिला टप्पा आहे,” असे सांगितले. या कार्यक्रमात विविध यशस्वी बचत गटांच्या पाच महिलांनी आपले अनुभव कथन करत व्यवसायात मिळालेल्या यशाबद्दल मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला बचत गटाचे पदाधिकारी मीना कारेकर, संगीता कांबळे, राजश्री गायकवाड यांनी यापूर्वीचे बीज भांडवल कर्ज योजनेत घेतलेल्या लाभाची प्रगती अहवाल, आढावा घेत माहिती देत संवाद साधत मार्गदर्शन केले.   

सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले. आभार प्रदर्शनाने बीज भांडवल कर्ज वाटप उपक्रमाची उत्साहात सांगता झाली.

थोडे नवीन जरा जुने