— शेतकरी व गुंतवणूकदारांच्या न्यायासाठी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयावर दलित पँथर चा मोर्चा—
पुणे : शेतकरी, कष्टकरी व हातावर पोट असलेल्या हजारो सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या ‘समर्थ कॉप केअर’ या संस्थेविरोधात तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी दलित पँथरच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाची सुरुवात पुणे कॅम्प येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. त्यानंतर घोषणाबाजी करत मोर्चा पोलीस आयुक्त कार्यालयावर धडकला. या आंदोलनाचे नेतृत्व दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष यशवंत नडगम यांनी केले.
यावेळी आंदोलकांनी फसवणूक प्रकरणातील मुख्य व सहआरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व एजंट व मध्यस्थांवर गुन्हे दाखल करून आरोपींची बँक खाती, मालमत्ता व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करावी व जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांना कायदेशीर संरक्षण देण्याचीही मागणी निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली.
यावेळी बोलताना यशवंत नडगम म्हणाले की, “चार दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास मुंबई येथे विधानभवनावर विराट मोर्चा काढण्यात येईल. शेतकरी व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळालाच पाहिजे.”
या आंदोलनात श्रीकांत लोणारे, संतोष गायकवाड, स्नेहा माने, आकाश पायाळ, बंडू गवळी, सोमनाथ साळवे, नागनाथ निळ, रोहित कांबळे, जेम्स बालबद्र, विशाल ओव्हाळ, सनी पंजाबी, अजिंक्य म्हस्के, संजय पोटभरे ,कुणाल साठे ,अतुल गायतडाखे यांसह राज्यातील विविध भागांतील फसवणूकग्रस्त गुंतवणूकदार, दलित पँथरचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
