Alandi : ज्ञानोबा-तुकोबांचे विचारच भारताला विश्वगुरू बनवेल - डॉ. अविनाश धर्माधिकारी यांचे विचार

 


आळंदीत ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदेचे उद्घाटन

आळंदी (अर्जुन मेदनकर) : अध्यात्म आणि विज्ञानाचे एकत्रिकरणकेल्यास भारताला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देता येऊ शकते. परंतू युवकांमध्ये वाढत जाणारी व्यसनाधिनतेला थांबवून त्यांना भक्तीची नशा लावावी. हे कार्य केवळ वारकरी संप्रदायच करू शकते. ज्ञानोबा-तुकोबांच्या विचारांवर जेव्हा युवक चालेल तेव्हाच भारत विश्वगुरू बनेल. असे विचार चाणक्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. 

‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एज्युकेशन, पुणे’ व ‘एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद’ यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमानवाडी आळंदी (देवाची) येथील डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल येथे आयोजित दोन दिवशीय  ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’चे उद्घाटन द्विप प्रज्वलन करून करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

या प्रसंगी देहूचे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बापूसाहेब महाराज मोरे, डॉ. सुनिल खांडबहाले, पद्मश्री पोपटराव पवार, मुंबई येथील श्रीसंत नामदेव महाराज कीर्तन महाविद्यालय जगन्नाथ महाराज पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. या गोलमेज परिषदेचे संकल्पक एमआयटी डब्ल्यूपीयूचे  कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, यशोधन महाराज साखरे, रामकृष्ण महाराज, परिषदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, राष्ट्रीय सरपंच संसदेचे सह समन्वयक प्रकाश महाले उपस्थित होते. 


  डॉ. अविनाश धर्माधिकारी म्हणाले, या देशामध्ये युवकांचे उत्तम चारित्र्य घडविण्यासाठी वारकरी संप्रदाय महत्वाचा आहे. शिक्षणाचे कार्य हे चरित्र घडविण्याचे आहे. कोणतेही कार्य शुद्ध बुद्धिने व कर्तृत्वाने नीट केले तर समाजाची घडी व्यवस्थित बसेल. ज्ञानोबा तुकोबांच्या मार्गदर्शनाची गरज सर्वांना आहे. त्यांनी भक्ती आणि शक्तीच्या चळवळीचा संदेश दिला आहे. 

डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,कीर्तनकारांनी समाजाला जागृत करण्यासाठी ज्ञानोब तुकोबाचा संदेश पोहचवावा. बुद्धि ही सद्बुद्धी असावी. आत्म अविनाशी असून मन चंचल आहे. अशा वेळेस मनाला स्थिर करण्याचे साधन कोणते हे ज्ञानेश्वरांच्या ज्ञानात आहे.

 डॉ. सदानंद मोरे म्हणाले, सरकारी यंत्रणा आणि संप्रदाय यांच्यातील ही परिषद एक दुवा आहे. प्रत्येकाने आपली जवाबदारी ओळखून ती पूर्ण पाडावी. आज समाजाची वर्तमान स्थिती पाहता वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रातील धर्म टिकवून ठेवला आहे. वारी ही एक पॉवर हाऊस आहे. ती समाजाला दिशा देण्याची क्षमता ठेवते. १२९० मध्ये ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली. त्यानंतर काळानुरूप अनेक धर्माचे आक्रमण झाले तरी या संप्रदायाने आपले मुळ घट्ट रोवून ठेवले होते. 

डॉ. राहुल कराड म्हणाले, परिषदेत वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून होत असलेले मौलिक लोककल्याणाचे कार्य, आध्यात्मिक प्रबोधनाबरोबरच लोक जीवनातील विविध दैनंदिन समस्यांच्या निराकरणासाठी अधिकाधिक कसे उपयोगी होईल. या विषयावर विविध अंगाने विचारमंथन होत आहे. येथे सामाजिक प्रबोधनाचे नवीन विषय व कार्याची निश्चित दिशा ठरविली जाणार आहे.

पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, समाज एक संघ बांधण्याचे कार्य वारकर्‍यांनी केले आहे. परंतू भविष्यातील सर्वात मोठ्या समस्या पर्यावरण, मातीचे आरोग्य, व्यसनाधिन होत चालेली पिढी आहे. अशावेळेस संत साहित्याची वाटचाल पाहिली तर ज्ञानेबा तुकोबांची परंपरा ही आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालूनच समाज व भविष्यातील पुढील पिढी समृद्ध होईल. 

जगन्नाथ महाराज पाटील म्हणाले, कल्याणाच्या मार्गाने चालणार्‍यांचे दर्शन करण्यासाठी ही परिषदे आहे.  भारताच्या भविष्यासाठी लंडन येथे १९३० मध्ये गोलमेज परिषद भरविण्यात आली होती. त्यानंतर विश्वकल्याणासाठी ही परिषद आहे. समस्यांना समोर जातांना त्या सोडविण्यासाठी वारकरी विचार प्रणाली हाच उपाय आहे.

योगेश पाटील प्रास्ताविकेत म्हणाले, परिषदेत संपूर्ण महाराष्ट्रातील ६० कीर्तनकार आणि १५० सरपंच सहभागी झाले. जागतिक सामाजिक सस्यांचे निराकरण करण्याचे कार्य केवळ वारकरी संप्रदायच करू शकतात. वारकरी संप्रदायाच्या समोरील अडचणी जाणून त्यावर प्रगतिशिल आराखडा तयार करून कार्य या परिषदेच्या माध्यमातून केले जाणार आहे. यानंतर बापू महाराज मोरे व डॉ. सुनिल खांडबहाले यांनी आपल्या भाषणात सांगितले की वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मानव जातीचे कल्याण होऊ शकते. त्यासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालावे. सूत्रसंचालन डॉ. शलिनी टोणपे यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने