मुंबई / पिंपरी-चिंवचड - पिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडी-जाधववाडी येथील दीपक भगत यांना कर्ज देण्याच्या बहाण्याने कागदपत्रे घेतली. त्याच्या आधारे बनावट कंपनी स्थापन केली. त्या कंपनीच्या माध्यमातून बोगस बिले सादर केली आणि इनपूट टॅक्स घेवून सरकारचा करोडो रुपयांचा वस्तू व सेवा कर (GST) बुडवला आहे. सेवा कर गुप्तवार्ता संचालनालयाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असली, तरी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याची चर्चा करुन गृह विभाग व जीएसटी विभागाकडून आरोपींवर कठोर करावाई करण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले.
जाधववाडी येथे राहणारा मोहम्मद कैश रहमानी याने कर्ज देण्याच्या बहाण्याने दीपक भगत यांची कागदपत्रे घेतली. त्याद्वारे बोगस कंपनी तयार केली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. रेहमानी याने आशिया स्टील ट्रेडर्स दुकानाद्वारे कोट्यवधींचा जीएसटी बुडवला आहे. शहरात असे रॅकेट कार्यरत आहे. जे गोरगरिब लोकांची फसवणूक करीत आहे. राष्ट्रविघातक कृत्यांमध्येही त्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली.
आमदार लांडगे म्हणाले की, मोहम्मद रेहमानी यांने बनावट कंपनी स्थापन केली आणि करोडो रुपयांचा जीएसटी बुडवला. मूळ फिर्यादीवर दबाव आणला आणि जामीनावर हा व्यक्ती बाहेर आहे. अशाप्रकारची फसवणूक अनेक गोरगरीब लोकांची झाली आहे. देशविघात कृत्यांमध्ये हा पैसा वापरला जात असावा, असा संशय आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी आणि संबंधितांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावी. असे रॅकेट पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत आहे, या प्रकरणामध्ये सराईत लोकांचा सहभाग आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.
काय आहे प्रकरण?
जाधववडी येथे राहणारा मोहम्मद कैश रेहमानी याने लोन देण्याच्या बहाण्याने दीपक भगत यांची कागदपत्रे घेतली. त्याद्वारे आशिया स्टील ट्रेडर्स नावाची बनावट कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून कशफ ट्रेडिंग कंपनीला बनावट बिले दिली. यामाध्यमातून इनपूट टॅक्स क्रेडिट (ITC) घेवून 9.86 कोटी रुपयांचा जीएसटी बुडवला. केंद्रीय गुप्तवार्ता महासंचालनालय कार्यालय पुणे यांनी चौकशी केली. जीएसटी त्यावरील व्याज आणि शास्ती असा 21.71 कोटी रुपयांच्या रकमेची वसुली करण्याचा आदेश केंद्रीय वस्तू व सेवा कर सहआयुक्त पुणे यांना देण्यात आला. फसवणूक प्रकरणी आरोपी मोहम्मद कैश रेहमानी आणि मोहमद अहमद उर्फ आदील रेहमानी या दोघांना अटक झाली होती. आरोपी जामिनावर बाहेर आहेत. अटक न झालेला आरोपी अब्दूल मुस्लीम चौधरी याने अटकपूर्व जामिनासाठी मा. सत्र न्यायालय, शिवाजीनगर येथे अर्ज केला असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
प्रतिक्रिया :
गोरगरीब कामगारांच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन बनावट कंपनी स्थापन करणे आणि त्याआधारे शासनाची जीएसटी बुडवून मोठ्या प्रमाणात फसवणूक करणे, ही गंभीर बाब आहे. सदर प्रकरण केवळ सरकारची फसवणूक यापुरते मर्यादीत नाही. तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असून, देशविघातक कृत्यांमध्ये हा पैसा वापरला असल्याची शक्यता आहे. गृहविभाग, गुप्तचर यंत्रणा यांच्या माध्यमातून सखोल चौकशी करुन कठोर कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत ‘ब्रीफिंग’ करुन सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल.
- ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य