PCMC : '‘विकासाभिमुख हिंदूत्व’’चा अजेंडा अन्‌ विधानसभा अधिवेशनामध्ये ‘‘दस का दम’’! भाजपा आमदार महेश लांडगे यांनी विविध मुद्यांवर राज्य सरकारचे लक्ष वेधले


- समस्या, विकासकामे अन्‌ धर्मांतराच्या मुद्यावरही मांडली रोखठोक भूमिका

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाला. विविध मुद्यांवर हे अधिवेशन गाजले. पिंपरी-चिंचवडसह पुणे परिसरातील विविध प्रश्नांवर सभागृहात चर्चा झाली. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी अधिवेशनात मांडलेल्या 10 प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. यामध्ये हिंजवडी आयटी पार्क समस्यांपासून चाकण  औद्योगिक पट्टयातील वाहतूक समस्यांसह पिंपरी-चिंचवडच्या प्रारुप विकास आराखड्यावर रोखठोक भूमिका मांडली. आयटी फोरम आणि सोसायटी फेडरेशनच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांनी शिष्टमंडळाला वेळ दिला आणि प्रशासन खडबडून जागे झाले. अधिवेशनात आमदार लांडगे यांच्या लक्षवेधी, औचित्याचा मुद्दा आणि प्रश्नोत्तराच्या तासामध्ये ‘‘दस का दम’’ पहायला मिळाला.

मुंबई येथील विधान भवनमध्ये दि. 31 जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कामकाज बंद असते. त्यामुळे एकूण 15 दिवस सभागृहाचे कामकाज चालले. या काळात आमदार महेश लांडगे यांनी सभागृहामध्ये महानगरपालिकेचा प्रारुप विकास आराखडा, हिंजवडी आयटी पार्क समस्या, चाकण औद्योगिक पट्टयातील समस्या, प्राधिकरणाच्या हद्दीतील मिळकती ‘‘फ्री होल्ड’’ करणे, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीची समस्या, पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड एलिव्हडेट कॉरिडॉरसाठी भूसंपादन कामी निधी उपलब्ध करणे, जीएसटी फसवणूक रॅकेट, चिखली घरकूलवासीयांची घरपट्टी माफ करणे, नदी सुधार प्रकल्प, पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न यासह दारुबंदी विधेयकावर सकारात्मक भूमिका मांडली आणि राज्य सरकारकडे सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांची बाजू सक्षमपणे मांडली.

दरम्यान, आमदार लांडगे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून मौजे डुडुळगाव येथील वन विभागाच्या हद्दीतील रस्त्यासह विकासकामांना महापालिका प्रशासनास ‘‘एनओसी’’ द्यावी याकरिता पाठपुरावा केला. या रस्त्याची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. भोसरीसह पिंपरी-चिंचवड शहरातील वीज समस्या सोडवण्यासाठी उर्जा विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्याद्वारे दिघी कॅम्प शाखेला महावितरण प्रशासनाने मंजुरी दिली. त्यामुळे भोसरी, दिघी आणि चऱ्होली असे तीन विभाग महावितरणचे होणार आहेत.

हिंजवडी आयटी पार्कची समस्या मुक्तीकडे वाटचाल...

पिंपरी-चिंचवड, पुणे शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख असलेला हिंजवडी आयटी पार्क समस्यांच्या गर्तेत आहे. पायाभूत सोयी-सुविधा आणि वाहतूक कोंडीविरोधात आयटीयन्सनी ‘‘अनक्लॉग हिंजवडी’’ ही मोहीम सुरू केली. आमदार महेश लांडगे यांच्याकडे आयटीयन्स आणि सोसायटीधारक प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक लावण्याची विनंती केली होती. 

त्यानंतर तात्काळ पाठपुरावा करीत सदर बैठक घेण्यात आली. त्यात प्रशासनाला कार्यवाहीचे आदेश दिले. विशेष म्हणजे, हिंजवडीची आयटी पार्क कोंडीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाहीसुद्धा सुरू केली. भूमकर चौक, माण आणि लगतच्या परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात येत आहेत. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कची समस्या मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे, असे चित्र स्पष्ट दिसते.

भूमिपुत्रांसाठी उठवला आवाज...!

पिंपरी-चिंचवड शहराचा प्रारुप विकास आराखडा महानगरपालिका प्रशासनाने प्रसिद्ध केला आहे. त्याच्या हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. प्रशासनाने अनावश्यक आरक्षण टाकू नये. शहरातील मंदिरे आणि धार्मिक स्थळांच्या जागांमध्ये आरक्षण नको. यामध्ये मोशी नागेश्वर महाराज मंदिर आणि रुपीनगर येथील वाघजाईमाता मंदिराचा उल्लेख करीत आमदार महेश लांडगे यांनी डीपी शहराच्या हितासाठी करावा. पण, भूमिपुत्र भूमीहिन होता कामा नये. गोरगरिबांच्या घरांवर कारवाई करुन विकास साधता येणार नाही, अशी परखड भूमिका सभागृहात मांडली. 

पिंपरी-चिंचवडकरांनी मांडलेल्या हरकती आणि सूचनांची पारदर्शीपणे पडताळणी करावी आणि सर्वसमावेशक व भूमिपुत्रांच्या हक्कांचे रक्षण करणारा विकास आराखडा निश्चित करावा, अशी मागणी केली. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत पूर्वी बांधलेल्या मिळकती आता महापालिकेच्या कार्यक्षेत्रात आहेत. त्या ‘‘फ्री होल्ड’’ कराव्यात. तसेच, प्राधिकरणाने लोकांना लॉटरी पद्धतीने दिलेल्या जागांवर रेडझोनची सिमारेखा दाखवली आहे, ती रेडझोनमुक्त करावी. यासह शासकीय इमारती आता वापरात नाहीत. त्या जीर्ण झाल्या आहेत. त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची मागणी केली. त्याला कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक उत्तर दिले.

देव-देश अन्‌ धर्मासाठी कटिबद्ध...

विकासाच्या मुद्यांसह आमदार महेश लांडगे यांनी देव-देश अन्‌ धर्मासाठी कटिबद्ध असल्याचे अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित केले. धर्मांतराचा मुद्दा सभागृहात चांगलाच गाजला. सांगली येथील ऋतुजा राजगे यांनी ‘‘प्राण सोडला पण धर्म सोडला नाही..’’ असा उल्लेख करीत राज्यात धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी अल्पसंख्याक समाज भीतीच्या सावटाखाली आहे, असा दावा सभागृहात केला. 

त्यांवेळी ‘‘आमच्या दहा-आकरा वर्षांच्या मुलींवर अत्याचार झाले.. त्यावेळी तुम्ही का बोलला नाही..’’ असा आक्रमक पवित्रा आमदार लांडगे यांनी घेतला. हा मुद्दा महाराष्ट्रभरात गाजला. राज्यातील गुरव, पुजारी, मानकरी समाजाला देवस्थान विश्वस्त संस्थांमध्ये हक्क मिळावा. यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली. ‘जीएसटी’ फसवणूक प्रकरणातील महोम्मद रेहमानी याच्यासह साथीदारांवर मोक्का लावावा. राज्यातील गोरक्षकांचे सरंक्षण करावे, अशा हिंदूत्वाच्या मुद्यांवरही आमदार महेश लांडगे यांनी सभागृह गाजवले.

प्रतिक्रिया :

पिंपरी-चिंचवडसह पुणे परिसराच्या विविध मुद्यांवर विशेषत: वाहतूक कोंडी, पर्यावरण संवर्धन, नदी सुधार प्रकल्प आणि सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या पायाभूत सोयी-सुविधा यासाठी आम्ही सातत्याने काम करीत आहोत. अधिवेशनाच्या निमित्ताने संबंधित मंत्रीमहोदय यांनी सकारात्मक उत्तरे दिली आहेत. त्यासाठी आगामी काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार आहोत. विकासाभिमुख हिंदूत्व ही आमच्या राजकीय व सामाजिक जीवनाची ‘‘लाईन ऑफ ॲक्शन’’ आहे.

- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे


थोडे नवीन जरा जुने