PCMC : हिंजवडीच्या प्रश्नासंबंधी विभागीय आयुक्तांकडे बैठक! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानंतर प्रशासनाची कार्यवाही


- भाजपा आमदार महेश लांडगे यांची माहिती

पिंपरी चिंचवड : हिंजवडी आयटी पार्क 'कोंडीमुक्त' करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीमध्ये पहिली आढावा बैठक होणार आहे. त्यामध्ये संबंधित सर्व शासकीय विभागांचे अधिकारी सहभागी होतील, अशी माहिती भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिली.

हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या नागरी व वाहतूक समस्यांचा दोन दिवसांपूर्वी आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालबद्ध कार्यक्रम आखून, विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सिंगल पॉईंट एथॉरिटी हिंजवडीचे प्रश्न मार्गी लावतील, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही सुरु केली आहे.  मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर होत असलेल्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा 'आयटी हब' असलेला हिंजवडी परिसर समस्यांनी ग्रासला आहे. येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. या परिसरात दररोज सुमारे पाच लाखांहून अधिक आयटी व्यावसायिक येथे ये-जा करतात. मात्र, अपुरी पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुर्दशा आणि समन्वयाचा अभाव या समस्यांमुळे रहिवासी व कर्मचाऱ्यांचे आयुष्य कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर "हिंजवडी आयटी पार्कला अडथळ्यांमधून मुक्त करा" अशी मागणी या परिसरातील कर्मचारी, स्थानिक नागरिक, आयटी फोरम, सोसायटी फेडरेशन यांनी केल्यानंतर या मागणीकडे खऱ्या अर्थाने आमदार लांडगे यांनी लक्ष वेधले. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत संवाद साधत मुंबईमध्ये संबंधित विभाग, आयटी फोरम सोसायटी फेडरेशन अशा सर्वांची बैठक आयोजित केली होती.

दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर आमदार महेश लांडगे यांनी याचा पाठपुरावा करत तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली.  विभागीय आयुक्तांची पहिली बैठक असून या बैठकीसाठी सर्वांचेच लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया :

हिंजवडीमधील समस्या सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. सर्व विभागांचे एकत्रीकरण करून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  बैठक घेतली. मुख्यमंत्री यांच्या निर्देश दिल्यानुसार, 'सिंगल पॉइंट अथोरिटी' म्हणून  विभागीय आयुक्त यांची बैठक होईल. आगामी काळात हिंजवडी समस्या मुक्त होईल, असा विश्वास आहे.

- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

थोडे नवीन जरा जुने