- भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी चिंचवड - महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) च्या नाशिक रोड व चऱ्होली शाखांचे पुनर्विभाजन करून, नवीन दिघी कॅम्प शाखा कार्यालय स्थापन करण्यास मुख्य कार्यालय, महावितरण, मुंबई येथून मंजुरी मिळाली आहे. वाढती ग्राहक संख्या आणि अधिक कार्यक्षम सेवा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी शहरातील वीज पुरवठा सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणेकामी राज्याचे मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्त्याने पाठपुरावा केला आहे. महिनाभरापूर्वी मुंबई येथील उर्जा भवनला याबाबत सविस्तर बैठक झाली होती. त्यावेळी शाखा विभाजनाच्या मुद्यावर त्यांनी लक्ष वेधले होते.
वीज ग्राहकसंख्येचे पुनर्विभाजन खालीलप्रमाणे नाशिक रोड शाखा पूर्वीची ग्राहक संख्या 60 हजार 940 इतकी होती. आता नव्या पुनर्विभाजनानंतर ग्राहक संख्या 31 हजार 739 इतकी राहणार आहे. या शाखेअंतर्गत अलंकापूरम, चक्रपाणी वसाहत, गोडाऊन चौक, मोहन नगर असा परिसरत आहे. तसेच, चऱ्होली शाखेत पूर्वीची ग्राहक संख्या 33 हजार 449 होती. नव्या पुनर्विभाजनानंतर ग्राहक संख्या 28 हजार 282 इतकी निश्चित केली आहे. या शाखेअंतर्गत चार्होली गाव आणि परिसराचा समावेश आहे.
2014 मध्ये आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत निवडून आल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्याचा संकल्प हाती घेतला. त्यानंतर 2017 मध्ये महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर समाविष्ट गावांच्या विकासाला चालना मिळाली. त्यामुळे चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर विकसित झाला. आता समाविष्ट गावांत वीज पुरवठा सक्षम होण्यासाठी महावितरण शाखा विभाजन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
नवीन दिघी कॅम्प शाखेत 34 हजार 368 ग्राहक...
महावितरणने स्थापन केलेल्या नवीन दिघी कॅम्प शाखेत 34 हजार 368 ग्राहक संख्या आहे. त्यामध्ये दिघी गाव, बी यु भंडारी, मॅगझीन चौक, माऊली नगर, साई पार्क भागाचा समावेश आहे. एकूण ग्राहकसंख्या (तीनही शाखांची एकत्रित) 94 हजार 389 इतकी झाली आहे. महावितरणने केलेल्या या निर्णयामुळे विजेच्या वितरण व्यवस्थेची गुणवत्ता, वेग आणि प्रतिसादक्षमता वाढणार असून, ग्राहकांची समाधानाची पातळी अधिक उंचावेल, अशी अपेक्षा आहे.
प्रतिक्रिया :
महावितरणकडून ग्राहकांना वेळेत आणि कार्यक्षम सेवा मिळावी, तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद मिळावा, तसेच क्षेत्रीय वितरण भार संतुलित रहावा यासाठी हे पुनर्विभाजन करण्यात आले आहे. नवीन शाखेच्या स्थापनेमुळे दिघी परिसरातील ग्राहकांना आता स्थानिक पातळीवरच सर्व वीज वितरण सेवांचा लाभ घेता येणार आहे. यामुळे ग्राहक सेवा केंद्रांवरचा ताण कमी होणार असून, नवीन शाखा कार्यान्वयीत होईल, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार आहे.
- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे
.