वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पुन्हा २५% आयात कर (टॅरिफ) लादण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार असून, यामुळे भारत-अमेरिका व्यापारी संबंधांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी एप्रिल २०२५ मध्ये भारतावर २६% कर लादला होता, जो ९० दिवसांसाठी स्थगित करण्यात आला होता. आता पुन्हा २५% कर लागू करण्याच्या निर्णयाने भारतीय निर्यातदार आणि उद्योगांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात व्यापार धोरणांवर आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी "मेक अमेरिका वेल्थी अगेन" या मोहिमेंतर्गत आयात कर वाढवण्याचे धोरण स्वीकारले आहे. या पुर्वी ट्रम्प यांनी भारताने अमेरिकन वस्तूंवर लादलेल्या उच्च कर आणि गैर-कर व्यापारी अडथळ्यांचा हवाला देत हा निर्णय घेतला होता.
आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून सैन्य उपकरणे आणि कच्चे तेल खरेदी केल्यामुळेही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, रशियाने युक्रेनवरील हल्ले थांबवावेत अशी सर्वांची इच्छा आहे, परंतु भारत रशियाशी व्यापार वाढवत आहे, जे ‘अयोग्य’ आहे. यामुळे भारतावर टॅरिफसह अतिरिक्त दंड लावण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
अमेरिकेच्या २५% टॅरिफच्या निर्णयामुळे भारताच्या निर्यात क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, परंतु भारत सरकार सक्रियपणे यावर उपाय शोधत आहे. द्विपक्षीय व्यापार करार आणि धोरणात्मक चर्चा यामुळे येत्या काही महिन्यांत यावर तोडगा निघू शकतो.
US-imposes-25%-import-duty-on-India-again-Donald-Trump