आळंदीत इंद्रायणी नदी घाटाची तोडफोड देखभाल दुरुस्ती कडे प्रशासनाचे दुर्लक्ष, आळंदीतील मैला मिश्रित सांडपाणी थेट नदी पात्रात


आळंदी (अर्जुन मेदनकर) : तीर्थक्षेत्र आळंदी परिसर विकास समितीचे माध्यमातून आळंदीच्या इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या दगडी घाटाची जी तोडफोड सुरू आहे ती तात्काळ थांबवावी. तसेच नदीचे घाट पूर्ववत करून देण्याची मागणी वारकरी भाविकांनी केली आहे. यापुढील काळात या मागणीसाठी अधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा खणखणीत इशारा यावेळी देण्यात आला.

  आळंदीतील घाटाची तोडफोड प्रकरणी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सदगुरू बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळा, संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा पालखी सोहळ्याच्या वतिने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले होते. वारकरी भाविकांनी लक्ष घालण्याचे साकडे यावेळी पुणे जिल्हा प्रशासनास घातले होते. मात्र वारकरी भाविक, दिंडीकरी यांनी दिलेल्या निवेदनावर प्रभावी कामकाज करण्याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. 

  उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी वारकरी, भाविकांना आश्वासन देत संबंधित मागणी वरिष्ठां पर्यंत पोहचविल्या जाईल असे आश्वासन देखील दिले. मात्र आळंदी नगरपरिषद हद्दीतील स्काय वॉक परिसरातील इंद्रायणी घाटाची दुरावस्था कायम राहिली असून सांडपाणी, मैला मिश्रित सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत आळंदी नगरपरिषद हद्दीतून जात आहे. या मुले भाविक, वारकरी, नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. 

  माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे, श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती आणि विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावर करोडो रुपये खर्च करून लोक वर्गणीतून घाट विकसित करून आळंदीचे वैभवातवाढ करण्यात आली आहे. या  माध्यमातून सार्वजनिक हितासाठी पर्यावरण सुधार आणि प्रदूषण नियंत्रण या दृष्टीकोनातून नियोजन बद्ध दगडी घाट बांधण्यात आले आहे. या कार्यासाठी एमआयटीचे डॉ. विश्वनाथ दा. कराड, वै.किसन महाराज साखरे, वै. पद्मश्री शंकर बापू आपेगावकर व वै. धुंडा महाराज देगलूरकर तसेच संप्रदायातील शेकडा थोर मान्यवरांनी पुढाकार घेतला होता. तसेच येथे घाटाचे सुंदर रेखीव व कोरीव कार्य सुरू आहे. 

दर्शनबारी, गोमुखाद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याचे व्यवस्थापन, तिर्थक्षेत्राकडून ज्ञान तीर्थ क्षेत्राकडे हा वारकरी व समाजातील लोकांसाठी अभिनव उपक्रम सुरू आहे. सुमारे १४५ फूट उंच सुवर्णजडित गरूड स्तंभाची निर्मिती ही सौदर्यात भर पाडणारी आहे. 

  सध्या स्थितीला येथे सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी नलिका टाकण्याचे जे काम सुरू आहे. त्यामुळे वारकरी भाविक भक्तांचे मन दुखावलेले आहे. याच भाविकांनी आपल्या आई वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ घाटाच्या कार्यासाठी आर्थिक योगदान देऊन एक एक दगड लावला आहे. सध्या घाटाची दुरावस्था पाहून  अंतकरणात तिव्र वेदना होत आहे. त्यामुळेच उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देत घाटाचे विद्रुपीकरण तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली होती. समस्त वारकर्‍यांनी शांततामय मार्गाने भजन, हरिनाम गजर करीत आळंदी नगरपरिषदेचा निषेध देखील त्यावेळी केला होता.  

यावेळी कीर्तनकार, प्रवचनकार व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र पालखी सोहळा झाला तरी देखील इंद्रायणी नदीचे कडेचे सांडपाणी वाहू मालिकांचे काम अर्धवट असून संथपणा थेट नदीत जात असल्याने भाविक हे उघड्या डोळ्याने पाहत नाराजी व्यक्त करीत आहेत. 

  तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासह घाटाची दुरावस्था, घाटाची तोडफोड झाल्या नंतरही अजून देखभाल दुरुस्तीचे काम अपूर्ण असल्याने भाविकांतून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच इंद्रायणी नदी प्रदूषण आळंदीमध्ये थेट इंद्रायणी नदीत सांडपाणी, मैला मिश्रित पाणी थेट सोडले जात असून ते तात्काळ बंद करण्याची मागणी होत आहे. यामुळे भाविक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.  तरी तात्काळ नागरिक भाविकांची नाराजी दूर करण्यासाठी इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याचे काम, घाटाच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे अशी मागणी आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी केली आहे.

थोडे नवीन जरा जुने