Atharv Sudame : महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यंदा, 27 ऑगस्ट 2025 रोजी सुरू होणारा हा उत्सव भक्ती आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक मानला जातो. या पार्श्वभूमीवर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे यांनी गणेशोत्सव आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याला प्रोत्साहन देणारा एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर प्रसिद्ध केला. हा व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल झाला, परंतु त्यावर काही प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवल्याने वाद निर्माण झाला.
काय आहे व्हिडीओचा आशय ?
सुदामे यांचा व्हिडीओ गणेशोत्सवाच्या उत्साहाला आणि हिंदू-मुस्लिम समुदायांमधील सौहार्दाला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आला होता. या व्हिडीओत गणेशोत्सवाच्या उत्सवात दोन्ही समुदायांनी एकत्र येऊन सण साजरा करण्याचे दृश्य चित्रित करण्यात आले होते. व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासांतच तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. काही प्रेक्षकांनी या व्हिडीओतील काही दृश्ये आणि संदेश यांच्यावर आक्षेप नोंदवले. त्यानंतर अवघ्या चार तासांत तो डिलिट करण्यात आला. मात्र काहींनी या व्हिडिओच्या आशयाचे कौतुक केले आहे.
अथर्व सुदामे यांची माफी
व्हिडीओवर निर्माण झालेल्या वादानंतर अथर्व सुदामे यांनी सोशल मीडियावर एक निवेदन जारी करून माफी मागितली. त्यांनी स्पष्ट केले की, “व्हिडीओमागील हेतू कोणाच्याही धार्मिक किंवा सांस्कृतिक भावना दुखावण्याचा नव्हता. जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून माफी मागतो.” त्यांनी व्हिडीओ डिलिट केल्याचेही सांगितले.
वकील असीम सरोदे यांचा राज ठाकरेंना फोन
या व्हिडीओ वरील वादावर वकील असीम सरोदे यांची राज ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सरोदे यांनी दिली आहे. असीम सरोदे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हटले आहे की, अथर्व सुदामे यांनी घाबरून व्हिडीओ डिलीट केला हे योग्य केले नाही असे वाटले. अथर्व बाबत अनेक लोक विविध मते मांडतात. त्याच्या व्हिडीओ तील विनोदाच्या दर्जाबाबत बोलले जाते. परंतु त्याने ज्या सातत्याने रिल्स तयार केलेत, स्पर्धेच्या युगात स्वतःचा एक मार्ग तयार केला त्याचे कौतुक करायलाच पाहिजे. त्याचे काही विनोद अनेकांना उथळ,पांचट, निरर्थक वाटले असतील पण ते अश्लील नव्हते.
पुढे सरोदे यांनी म्हटले आहे, कधी उथळ, गंभीर, गमतीदार, विचार प्रवर्तक तर कधी सुमारही अशा वळणांवरून एखादा विषय नेमकेपणाने हाताळला जातो तेव्हा धमक्या देणाऱ्यांना घाबरून अथर्वने त्याचा अत्यंत सुंदर आणि सामाजिकता, बंधुभाव, प्रेम जपण्याचे आवाहन करणारा व्हिडीओ डिलीट करणे मला चिंताजनक वाटले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे असे टुकार हल्ले ठामपणे परतवून लावता आले पाहिजेत. तेवढ्यासाठी मी अथर्व सोबत आहे. राज ठाकरे साहेबानी अथर्वचे जाहीर कौतुक केले होत तेव्हा पासून अथर्वने अधिक जबाबदारीने अनेक विषय हाताळले असे सुद्धा दिसते. एका उत्तम व्यंगचित्रकाराने दिलेल्या कौतुकाच्या शब्दांनी अथर्वला प्रोत्साहन मिळाले. पण आता काही सुमार धर्मवादी अथर्वला धमक्या देत असतांना राज ठाकरेंनी व मनसेने अथर्वच्या सोबत उभे राहावे असे आताच माझे राज साहेबांसोबत बोलणे झाले. अथर्वने तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा. कोण काय करतंय ते बघूया, असेही सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Controversy over influencer Atharva Sudame's video-lawyer-Asim-Sarode-calls-Raj-Thackeray