मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : १७ वर्षांनंतर न्यायालयाकडून सर्व आरोपी निर्दोष

Malegaon-bomb-blast-case-After-17-years-all-accused-are-acquitted-by-court

मुंबई : २००८ मध्ये मालेगाव शहरातील भिक्कू चौकात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. १७ वर्षांच्या खटल्यानंतर आलेल्या या निकालाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव शहरातील भिक्कू चौकात सायंकाळी रामजानच्या नमाजाच्या वेळी ठेवलेल्या स्फोटकाने भीषण बॉम्बस्फोट झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) होता. तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी तपासादरम्यान साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्यासह इतर काही जणांना अटक केली होती.

या प्रकरणाने "भगवा दहशतवाद" हा शब्द राष्ट्रीय चर्चेत आला. तपासात साध्वी प्रज्ञासिंग यांच्या मोटरसायकलचा स्फोटाशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, २०११ मध्ये हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आले.

विशेष एनआयए न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांच्यासमोर पार पडली. खटल्यात एकूण ३२३ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. सरकारी पक्षाने सप्टेंबर २०२४ मध्ये आपले साक्षीपुरावे पूर्ण झाल्याचे जाहीर केले होते.

आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या हत्या, विस्फोटक कायदा, शस्त्रास्त्र कायदा, दहशतवादविरोधी कायदा आणि गैरकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा (यूएपीए) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, कोर्टाने पुराव्यांच्या अभावामुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

निकाल देताना न्यायालयाने नमूद केले की, सरकारी पक्ष तीन सप्लिमेंट्री चार्जशीट दाखल करूनही ठोस पुरावे सादर करू शकला नाही. तसेच, स्फोटात ९५ जण जखमी झाल्याचे सिद्ध झाले, परंतु आरोपींशी त्याचा थेट संबंध जोडता आला नाही.

या निकालानंतर राजकीय नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सवाल उपस्थित करत म्हटले, “हेमंत करकरे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते. आता सर्व आरोपी निर्दोष सुटले तर मग दोषी कोण? सरकारने याची जबाबदारी घेऊन स्फोटातील खरे दोषी शोधावेत.”

Malegaon-bomb-blast-case-After-17-years-all-accused-are-acquitted-by-court

थोडे नवीन जरा जुने