PCMC : शौर्य, निष्ठा आणि राष्ट्रप्रेमाचा भव्य गौरव - पीसीएमसीच्या वीर अग्निशामकांना ‘सेफ इंडिया हिरो प्लस’ सन्मान

 


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - देशसेवा, मानवसेवा आणि संकटसमयी जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या वीरांचा गौरव करण्यासाठी “के ई फायर अँड सेफ्टी” या १९९८ पासून कार्यरत अग्रगण्य संस्थेद्वारे प्रतिष्ठित “सेफ इंडिया हिरो प्लस” पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा मुंबईतील ऐतिहासिक हॉटेल ताज येथे १३ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडला.

हा पुरस्कार देशातील उत्कृष्ट अग्निशामक, बचावकर्ते आणि संकटसमयी धाडसी कार्य करणाऱ्या अग्निशमन कर्मचारी यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दिला जातो. या वर्षीच्या सोहळ्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागातील फायरमन दिनेश देविदास इंगळकर, मोशी अग्निशामक केंद्राचे वाहनचालक शांताराम पांडुरंग घारे, मुख्य अग्निशमन केंद्राचे लिडिंग फायरमन, हनुमंत धोंडीबा होले, फायरमन संतोष मधुकर सरोटे, फायरमन विलास राजाराम पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
--------------------------------------

सन्मानार्थ वीरांचा प्रवास

संतोष मधुकर सरोटे - १५ वर्षे भारतीय नौदलात ‘क्रॅश टेंडर इन्चार्ज’, ‘एअर ट्रॅफिक कंट्रोलर’ आणि ‘क्रॅश टेंडर ड्रायव्हर’ म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या. मागील २१ वर्षे पीसीएमसी अग्निशमन विभागात कार्यरत राहून रासायनिक गळती, पूर, औद्योगिक आपत्ती आणि कोविड काळात जीव धोक्यात घालून सेवा दिली.

विलास राजाराम पाटील – १७ वर्षांची भारतीय नौदल सेवा, जहाज व पाणबुडी मोहिमांमध्ये सहभाग, श्रीलंकेत शांती मोहिमेतील योगदान, आणि २००४ पासून अग्निशमन विभागातील कार्याचा उल्लेखनीय वारसा. मोठ्या आगी, बचावकार्य, आणि कोविड काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी अग्रभागी राहिले.

दिनेश देविदास इंगळकर – १६ वर्षे भारतीय सैन्यात ‘कॉर्प्स ऑफ सिग्नल्स’ मध्ये कार्य, श्रीलंकेत ‘इंडियन पीस कीपिंग फोर्स’ मोहिमेत सहभाग, आणि २००५ पासून पीसीएमसी अग्निशमन विभागात अनेक मोठ्या आगींवर नियंत्रण ठेवत नागरिकांचे प्राण वाचवले.

हनुमंत धोंडीबा होले- १५ वर्षे भारतीय नौदलात सेवा करताना श्रीलंकेतील शांती मोहिमेत सहभाग, तसेच विविध ठिकाणी कार्याचा अनुभव. २००५ पासून पीसीएमसी अग्निशमन विभागात लिडिंग फायरमन पदावर कार्यरत राहून STP टँकमधील कामगार वाचवणे, बोट अपघातातील नागरिकांचे प्राण वाचवणे यांसारखी अनेक धाडसी कामगिरी केली.

शांताराम पांडुरंग घारे - ३३ वर्षे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध सेवांमध्ये योगदान. यापैकी ५ वर्षे जकात विभागात, ५ वर्षे ऍम्ब्युलन्स सेवेत आणि २१ वर्षे अग्निशमन विभागात वाहनचालक म्हणून कार्यरत. आपत्कालीन परिस्थितीत वेग, दक्षता आणि समर्पणाने नागरिकांची मदत करत शेकडो जीव वाचवण्यात मोलाची भूमिका बजावली.
------------

आपल्या अग्निशामक दलातील हे वीर केवळ संकटांचा सामना करत नाहीत, तर प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेची हमी देतात. त्यांचे शौर्य, निष्ठा आणि राष्ट्रप्रेम हे पिंपरी-चिंचवड शहराच्या अभिमानाचे शिखर आहे. ‘सेफ इंडिया हिरो प्लस’ हा सन्मान मिळणे ही केवळ त्यांचीच नव्हे, तर संपूर्ण शहराची प्रतिष्ठा आणि गौरव वृद्धिंगत करणारी घटना आहे.

- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणे ही केवळ जबाबदारी नाही, तर ती एक सर्वोच्च मानवसेवा आहे. आपल्या वीर अग्निशामकांनी संकटाच्या प्रत्येक क्षणी दाखवलेले धैर्य, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा ही पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानाची बाब आहे. आजचा हा सन्मान त्यांच्या त्यागमय सेवेला आणि निःस्वार्थ कर्तव्यभावनेला आमच्याकडून दिलेली मनःपूर्वक दाद आहे.

- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

अग्निशमन सेवेत आम्ही दररोज नवी आव्हाने स्वीकारतो. माझ्या सहकाऱ्यांनी प्रत्येक प्रसंगाला धैर्य, कौशल्य आणि एकजुटीच्या बळावर सामोरे जाऊन नागरिकांचा विश्वास जिंकला आहे. आज मिळालेला हा सन्मान त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावाचा आणि आमच्या संपूर्ण दलाच्या कर्तव्यनिष्ठेचा गौरव आहे.

- उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, अग्निशमन विभाग, पीसीएमसी





   

थोडे नवीन जरा जुने