नवी दिल्ली (वर्षा चव्हाण) : भारतीय टपाल विभागाने घेतलेला ऐतिहासिक निर्णय
भारतीय टपाल सेवेत एक ऐतिहासिक बदल घडणार असून, 1 सप्टेंबर 2025 पासून रजिस्टर्ड पोस्ट सेवा पूर्णपणे बंद केली जाणार आहे. तब्बल 171 वर्षांची ही पारंपरिक सेवा आता स्पीड पोस्ट सेवेत विलीन होणार आहे. हा निर्णय पोस्ट विभागाच्या कामकाजात वेग, अचूकता आणि पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
रजिस्टर्ड पोस्टची जागा स्पीड पोस्ट घेणार
ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेली ही सेवा आजपर्यंत हजारो सरकारी कागदपत्रे, न्यायालयीन नोटिसा, शैक्षणिक प्रमाणपत्रे यांचा एक महत्त्वाचा भाग होती. मात्र, आता ही सेवा थांबवून तिच्या सर्व जबाबदाऱ्या स्पीड पोस्टकडे सुपूर्त केल्या जातील.
महागाईचा फटका सामान्य नागरिकांना
रजिस्टर्ड पोस्टपेक्षा स्पीड पोस्ट सेवा 20-25% महाग असल्याने, याचा थेट परिणाम शेतकरी, लहान व्यापारी आणि ग्रामीण भागातील नागरिकांवर होण्याची शक्यता आहे.
रजिस्टर्ड पोस्ट दर: ₹24.96 (50 ग्रॅमसाठी) + ₹5 प्रत्येक 20 ग्रॅमसाठी
स्पीड पोस्ट दर: ₹41 पासून (50 ग्रॅमपर्यंत)
कारणं काय?
पोस्ट विभागानुसार, रजिस्टर्ड पोस्टच्या वापरामध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घट झाली आहे.
1. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर
2. ई-मेल, मोबाइल अॅप्स
3. खाजगी कुरिअर कंपन्यांची वाढती लोकप्रियता
या कारणांमुळे पारंपरिक सेवेकडे पाठ फिरवली जात आहे.
स्पीड पोस्ट सेवा ही ट्रॅकिंग सुविधा, फास्ट डिलिव्हरी, आणि डिलिव्हरी अॅक्नॉलेजमेंट अशा सुविधा पुरवते, त्यामुळे सेवा अधिक विश्वासार्ह असेल, असा पोस्टाचा दावा आहे.