दक्षिण कोरियामध्ये शाळांच्या वर्गांमध्ये मोबाईल फोन वापरण्यावर बंदी


South Korea : दक्षिण कोरियाने बुधवारी एक विधेयक मंजूर केले असून त्यानुसार देशभरातील शाळांच्या वर्गांमध्ये मोबाईल फोन आणि इतर डिजिटल उपकरणांचा वापर बंद करण्यात येणार आहे. तरुणांमध्ये सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

ही बंदी पुढील वर्षी मार्चपासून लागू होणार असून, दक्षिण कोरिया अल्पवयीन मुलांमध्ये स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध घालणारा आणखी एक देश ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने अलीकडेच किशोरवयीन मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी आणली असून, नेदरलँड्समध्ये मोबाईलवर बंदी आणल्यानंतर विद्यार्थ्यांचे एकाग्रता सुधारली असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

यूएसमधील प्यू रिसर्च सेंटरच्या २०२२-२३ मधील पाहणीमधून असे दिसून आले आहे की, दक्षिण कोरिया हा जगातील सर्वाधिक डिजिटलदृष्ट्या जोडलेला देश आहे – ९९% कोरियन नागरिक ऑनलाइन असून ९८% लोकांकडे स्मार्टफोन आहे. या बंदीच्या विधेयकाला संसदेच्या मतदानात दोन्ही बाजूंचा पाठिंबा मिळाला.

"आपल्या तरुणांमध्ये सोशल मीडियाचे व्यसन हे आता गंभीर पातळीवर पोहोचले आहे," असे विधान विरोधी पक्ष ‘पीपल पॉवर पार्टी’चे खासदार आणि विधेयकाचे प्रायोजक चो जंग-हून यांनी संसदेत केले. आपल्या मुलांच्या डोळ्यांमध्ये रोज सकाळी लालसरपणा असतो. ते रात्री २-३ वाजेपर्यंत इंस्टाग्रामवर असतात, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षण मंत्रालयाच्या एका सर्वेक्षणानुसार, ३७% माध्यमिक व उच्च-माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो असे वाटते, तर २२% विद्यार्थी सोशल मीडियावर प्रवेश न मिळाल्यास चिंताग्रस्त होतात.

दक्षिण कोरियातील अनेक शाळांमध्ये सध्या स्वतःचे नियम लागू आहेत, जे आता या विधेयकामुळे औपचारिक स्वरूपात मान्य केले जातील. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किंवा शैक्षणिक उद्देशांसाठी डिजिटल उपकरणांचा वापर मात्र परवानगीयोग्य असेल. काही बालहक्क संघटनांनी या बंदीला विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ही बंदी मुलांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करेल.

South-Korea-bans-mobile-phone-use-in-school-classrooms
थोडे नवीन जरा जुने