Alandi : अलंकापुरीत गणेशोत्सव आनंद सोहळ्यास हरिनाम गजरात सुरुवात

 


श्रींची प्राणप्रतिष्ठापणा वेदमंत्र जयघोषात ; ढोल ताशांसह सवाद्य घंटेच्या ठणठणाटात मिरवणुक       

आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी पंचक्रोशीसह माऊली मंदिरात यावर्षीचे गणेशोत्सव आनंद सोहळ्यास परिसरात सर्वत्र उत्साही आनंदी, गणेश भक्तिमय जल्लोष, हरिनाम गजरासह वेदमंत्र जयघोषात प्रथापरंपरांचे पालन करीत बुधवारी ( दि. २७ ) जल्लोषात प्रारंभ झाला. एक गाव एक सार्वजनिक गणेशोत्सव या उपक्रमास मात्र यावर्षी फाटा देत ठीकठिकाणी घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. 

या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे तसेच सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळा निर्बंधमुक्त होत असला तरी परिसरातील सर्व नागरिक, सार्वजनिक मंडळे यांना भाविक, नागरिक यांची उत्सवात कायदा सुव्यवस्था, शांतता सुरक्षितता कायम राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने सर्व गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना दिल्या आहेत. यासाठी बैठका हि घेण्यात आल्या आहेत. 

 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया असा जयघोष करीत, ढोल ताशाचे दणदणाटात तसेच काही ठिकाणी वारकरी वेषांत टाळ,  मृदुंग, वीणेच्या त्रिनाद करीत हरिनाम जयघोषात श्रींची मिरवणूक काढून आगमन, स्वागत करीत श्रींची प्राणप्रतिष्ठापना केली. यावेळी भगवी सह सफेद टोप्या, लक्षवेधी फेटा घालून उत्साहात श्रींची मूर्ती घरी घेऊन जात गणेश भक्त दिसले.  माऊली मंदिरात ११ ब्रम्हवृंदानी वेदमंत्र जय घोष करीत श्रींची पूजा बांधली. आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा यांचे हस्ते पूजा, अभिषेख झाला. 

यावेळी व्यवस्थापक माऊली वीर, मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे पाटील, योगेश आरु, भिमाजी वाघमारे यांचेसह आळंदीतील क्षेत्रोपाध्ये पुजारी, सेवक, भाविक उपस्थित होते. मंदिरात गणेशोत्सवा निमित्त श्री गणेश अथर्वशीर्ष झाले. सोहळ्याचे काळात प्रवचन, कीर्तन सेवा वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने होणार आहे. गावकरी भजन सेवा परंपरेने होणार असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.     

आळंदीत माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली श्री हजेरी मारुती मंदीर येथे तसेच शिवतेज तरुण मित्र मंडळ, व्यापारी तरुण मंडळ, अखिल भाजी मंडई मंडळ, जय गणेश मंडळ, शिवस्मृती मित्र मंडळ, दत्तनगर प्रतिष्ठान, जय गणेश प्रतिष्ठान आदी मंडळांसह पंचक्रोशीतील औद्योगिक वसाहतीतील राठी पॉली बॉण्ड इंडिया प्रा.ली या कंपनीत देखील उत्साहात गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

  श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत परंपरेने मोहन महाराज शिंदे, सचिन महाराज शिंदे यांचे मार्गदर्शनात श्रींची पूजा, अभिषेख, मिरवणूक हरिनाम गजरात झाली. यावेळी वारकरी मुलांनी हरिनाम गजरात श्रींची मिरवणूक काढत जल्लोषात स्वागत केले. आळंदी धाम सेवा समितीचे वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी केले आहे.  

ध्यास प्रशालेत गणेशाचे उत्साहात आगमन

 येथील ध्यास फाउंडेशन संचलित महर्षी वाल्मिकी विद्यावर्धिनी व महर्षी वाल्मिकी बालक मंदिर विभागांत गणेशाचे शुभ आगमन जल्लोषात करण्यात आले. ' आला आला माझा गणराया ' अशी साद घालत गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. उपस्थित शिक्षकांचे हस्ते गणेशपूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी, गोपाल उंबरकर यांचेसह शुभ सोहळ्यास शालेय विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत गणेशाची प्राणप्रतिष्ठा, आरती करून प्रसाद वाटप करण्यात आले. मान्यवरांचे हस्ते धार्मिक कार्यक्रम आणि श्रींची आरती करण्यात आली.

  आळंदी पंचक्रोशीत मंगलमय वातावरणात श्रींचे मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उत्साहात झाली. यावेळी विधिवत पूजा करून उत्सवाचे कार्यक्रमास सुरुवात झाली. घरा घरात श्रीची मंगल मूर्ती मोरयाचे नामजयघोषात बसविण्यात आली. यावर्षीही श्री गणेश स्थापना दिनी हरिनाम गजरात श्रीना मिरवणुकीने प्रवेशत परंपरागत वाद्य वाजविता श्रींचे आगमन झाले. भक्तिमय वातावरण व गणेश भक्तांमध्ये जल्लोष दिवसभर होता.

आळंदीतील चौकांत  प्रचंड गर्दी

गणेश चतुर्थी अर्थात गणेश प्राणप्रतिष्ठापना दिनी आळंदी परिसरात विविध गणपती स्टॉल, पान, फुले, फळे, व गणपती सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकाने थाटली होती. या ठिकाणी गणेशभक्तांनी खरेदी साठी प्रचंड गर्दी केली. या मुले परिसरातील रस्ते गर्दीने, वाहनांचे रंगांनी फुललेले पाहण्यास मिळाले. दुकानांत विविध वस्तू व गणरायाच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती. यामुळे आळंदी परिसरात तसेच भैरवनाथ चौक, हजेरी मारुती मंदिर चौकास गाव जत्रेचे रूप आले होते. आळंदीकर ग्रामस्थांसह विविध सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.  खरेदीच्या वेळी सलग दोन दिवस आळंदीत वाहतूक कोंडी झाली होती. मात्र येथील आळंदी दिघी वाहतूक शाखेचे वारिष पोलीस निरीक्षक आणि यांचेसहकारी, वाहतूक पोलीस कर्मचारी, वॉर्डन यांनी परीश्रम पूर्वक आपल्या टीम सह रस्त्या वर उतरून सुरळीत सुरक्षित वाहतुकीचे नियोजन केले. यावेळी वाहतुकीचा प्रचंड ताण दिसत होता. आळंदीला पर्यायी रस्ते विकासाचा अभाव असल्याने भैरवनाथ चौक, मरकळ चौक, चाकण चौक, देहू फाटा चौक येथे वाहतुकीची कोंडी होती. वाहतूक पोलिसांनी दक्षता घेत वाहतुकीला मार्ग मोकळा करून देत वाहतूक कोंडी फोडली.

ज्ञानेश्वरी तील पहिल्या २० ओव्यांसह आरतीचे आवाहन

श्री ज्ञानेश्वरी तील पहिल्या २० ओव्यांचे सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव साजरा करताना होणाऱ्या आरती प्रसंगी वाचन करण्याचे आवाहन प्रा. श्रीधर घुंडरे यांनी केले आहे. गणेशोत्सवाचे काळात या २० ओव्यांतून गणेश स्तुती आणि श्री गणेश वर्णन भाविकांना समजणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी श्रींचे केलेले वर्णन या ओव्यांतून स्पष्ठ केले आहे.

आळंदी नगरपरिषदेचे पर्यावरण पूरक गणेशोत्सवास आवाहन

आळंदी शहरात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करून ध्वनी, जल आणि वायू प्रदूषण न करण्याचे आवाहन आळंदी नगरपालिकेने केले आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सवा साठी श्रींचे मूर्ती शाडू मातीच्या बनविण्यास प्रशिक्षण देऊन यात पुढाकार घेतला. श्रींचे मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या न घेता शाडू मातीच्या तसेच पर्यावरण पूरक बनवून  प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आळंदीतील ग्रामस्थ आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी खांडेकर यांनी केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात आळंदी पंचक्रोशीत कायदा, शांतता सुव्यवस्था कायम राहील याची दक्षता घेण्याचे आवाहन आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमाजी नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांनी केले आहे.

  गणेश उत्सवात ध्वनी, जल, वायू प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊन उत्सव पर्यावरण पूरक व्हावा यासाठी सार्वजनिक उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांना प्रशासनाने आवाहन केले आहे. गणेशोत्सवाचे पावित्र्य जोपासले जावे. तसेच पर्यावरण संवर्धन या सामाजिक उपक्रमासाठी नागरिकांसह गणेशोत्सव साजरे करणाऱ्या मंडळांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच श्रींच्या मूर्तींचे विसर्जन हे थेट इंद्रायणी नदीत न करता आळंदी नगरपालिकेने विकसित केलेल्या तात्पुरत्या हौद्यात करावे असे आवाहन आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे. गणेश उत्सव काळात साचलेले पूजा साहित्य निर्माल्या हे इंद्रायणी नदीत न टाकता इंद्रायणी नदी कडेला असलेल्या घंटागाडी निर्माल्य कुंडात  देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माझी वसुंधरा अभियान पर्यावरण पूरक गणेशोत्सव व स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत आळंदी नगरपालिकेने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ सर्वेक्षण २०२५ - २६ मोहिमे अंतर्गत आळंदी नगरपालिकेने स्वच्छतेस प्राधान्य देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास आवाहन केले आहे.

थोडे नवीन जरा जुने