Italy protest : मेलोनीच्या ‘NO’ मुळे इटली पेटले कसे? एका सर्वेक्षणानुसार, इटलीतील 64 टक्के लोक गाझातील मानवी परिस्थिती अतिशय गंभीर मानतात, तर 41 टक्क्यांचे मत आहे की पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली जावी. मात्र, उजव्या विचारसरणीची मेलोनी सरकार इस्रायल समर्थक आहे.
इटलीमध्ये पॅलेस्टाईन राज्याच्या मान्यतेस नाकारल्यामुळे आणि गाझामधील युद्धातील मृत्यूंवरून पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या विरोधात जोरदार निदर्शने उफाळून आली आहेत. देशभरात हजारो निदर्शकांनी रस्ते, बंदरे अडवली, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड केली आणि पोलिसांशी झटापट केली.
मिलान शहरात मध्य रेल्वे स्थानकावर निदर्शक आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करत निदर्शकांना पांगवले. काळे कपडे घातलेले आणि पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावणारे काही निदर्शकांनी रेल्वे स्थानकाची खिडकी फोडली आणि पोलिसांवर खुर्ची फेकली. या झटापटीत 60 हून अधिक पोलिस जखमी झाले असून, 10 हून अधिक निदर्शकांना अटक करण्यात आली आहे, असे राज्य माध्यमांनी सांगितले.
व्हेनेिस बंदरावर पोलिसांनी निदर्शकांवर पाण्याचा मारा (वॉटर कॅनन) करून आंदोलन पांगवण्याचा प्रयत्न केला. जिनोआ, लिवोर्नो आणि त्रिएस्ते या शहरांतील बंदरांवरही कामगारांनी निदर्शने केली. इस्रायलला पाठवली जाणारी शस्त्रास्त्रे आणि पुरवठा रोखण्यासाठी इटलीचा वापर होऊ नये, यासाठी हे बंदोबस्त होते.
बोलोनिया शहरात निदर्शकांनी महामार्ग अडवून वाहतूक ठप्प केली. पोलिसांनी पाण्याचा मारा करून त्यांना पांगवले. रोममध्ये हजारो लोकांनी रेल्वे स्थानकाबाहेर एकत्र येत मोर्चा काढला आणि एक प्रमुख रिंग रोड अडवली. "फ्री पॅलेस्टाईन" आणि "सगळं ठप्प करूया" अशा घोषणा त्यांनी दिल्या.
'लेट्स ब्लॉक एव्हरीथिंग' या नावाने देशव्यापी संप पुकारण्यात आला होता, जो ट्रेड युनियन्सकडून आयोजित करण्यात आला होता. गाझामधील हत्याकांड आणि मेलोनी सरकारच्या भूमिकेविरोधात ही निदर्शने झाली.
जरी इटलीने युएनमध्ये पॅलेस्टाईन राज्याच्या मान्यतेला पाठिंबा दिला असला, तरी मेलोनी यांनी अद्याप अधिकृत मान्यता देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय विरोधकांकडूनही जोरदार टीका होत आहे. मेलोनी यांनी या हिंसक आंदोलनांना “शरमेची गोष्ट” असे संबोधले आहे.