पिंपरी चिंचवड - मोशी गायकवाड वस्ती येथील लोटस नंदनवन या सोसायटी मध्ये एवढा तुफान पाऊस चालू असताना देखील रोज चार चार पाच पाच टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करून देखील यावर कोणत्याही प्रकारचा मार्ग निघत नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभार असल्यामुळे पाण्यासारखी मूलभूत गोष्ट देखील महानगरपालिकेकडून पुरेशा प्रमाणात मिळत नाही. याबाबत चिखली- मोशी- पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन कडे तक्रार केल्यानंतर. चिखली - मोशी- चऱ्होली हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष श्री. संजीवन सांगळे यांनी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री चेतन देवरे यांना प्रत्यक्ष सोसायटीमध्ये घेऊन जाऊन पाणीपुरवठ्याबाबत पाणीपुरवठा समस्याची दहाकता प्रत्यक्ष दाखवली.
एवढा मोठा पाऊस पडत असताना धरण तुडुंब भरलेली असताना देखील या सोसायटीला मागील पाच वर्षापासून अशाप्रकारे पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता चेतन देवरे यांनी सर्व पाहणी केल्यानंतर दोन-तीन दिवसांमध्ये सदर सोसायटीला नियमाप्रमाणे पुरेसे पाणी मिळेल याची शाश्वती दिली.
या परिसरातील सर्व स्थानिक नेत्यांना सदर सोसायटीच्या पाण्याची समस्या सांगून देखील कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही, उपयोग होत नाही. पुढाऱ्यांकडून नेत्यांकडून फक्त आश्वासन दिली जातात यामुळे सोसायटीमधील महिला भगिनी आणि इतर सदस्य यांचा संताप अनावर झाला होता. यावेळी जर पुढील चार-पाच दिवसांमध्ये महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर चिखली- मोशी- चऱ्होली - पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचे नियोजन करण्याचे सदर मिटिंग मध्ये ठरले..
प्रतिक्रिया:
पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असताना आमच्या भागातील काही सोसायट्यांमध्ये पावसाळ्यात देखील टँकरने पाणी विकत घ्यावे लागते ही शोकांतिका आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनाप्रमाणे जर पुढील चार-पाच दिवसात लोटस नंदनवन सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर महानगरपालिकेवर या सोसायटीमधील महिला भगिनींना घेऊन फेडरेशन मार्फत हंडा मोर्चा काढण्यात येईल. त्याचप्रमाणे जर प्रश्न सुटला नाही तर इथून पुढे होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याला, पुढाऱ्याला सोसायटीमध्ये प्रचारासाठी येऊ दिले जाणार नाही..
संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली- मोशी - चऱ्होली -पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन