पुणे : समाजवादी आंदोलनाला ९० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुण्यात भव्य समाजवादी एकजूट परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन आज (दि. १९ सप्टेंबर) सायं. ४ वाजता सिंहगड रोडवरील साने गुरुजी स्मारक येथे होणार आहे. ही परिषद १९ ते २१ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
या परिषदेचे आयोजन राष्ट्र सेवा दल, एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन, युसुफ मेहेरअली सेंटर, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व समाजवादी समागम यांनी संयुक्तपणे केले आहे.
उद्घाटन समारंभात उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते व अध्यक्ष माता प्रसाद पांडेय उद्घाटन करतील. १०० वर्षीय ज्येष्ठ समाजवादी व माजी खासदार पंडित रामकिशन ध्वजारोहण करतील. समाजवादी आंदोलनावरील विशेष प्रदर्शनाचे लोकार्पण राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते होणार आहे.
या उद्घाटन सत्रात प्रा. आनंद कुमार प्रमुख वक्ते असतील. सुभाष वारे संविधानाची प्रस्तावना वाचतील, तर स्वागतपर भाषण ॲड. सविता शिंदे करतील. अध्यक्षस्थानी रमाशंकर सिंह (कुलपती, आयटीएम विद्यापीठ) असतील. प्रमुख पाहुणे म्हणून हरभजनसिंग सिद्धू (महामंत्री, हिंद मजदूर सभा) उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी आयोजक संस्था आपली मते मांडतील. स्मारिका व पुस्तकांचे प्रकाशन होणार असून पंडित रामकिशन शर्मा, पन्नालाल सुराणा, प्रा. राजकुमार जैन, हिम्मत सेठ, चंद्रा अय्यर, भीमराव पाटोले, रावसाहेब पवार, वर्षा गुप्ते, प्रमिला ठाकूर फुले, उमाकांत भावसार या ज्येष्ठ समाजवाद्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेतील विविध सत्रांमध्ये समाजवादी विचारांची चिकित्सा व आव्हानांवर चर्चा होणार असून देशभरातून समाजवादी कार्यकर्ते या संमेलनात सहभागी होणार आहेत.