PCMC : हरनाम सिंह ते शेखर सिंह पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी ‘‘एक पाऊल पुढे’’




- भाजपा आमदार महेश लांडगे यांची भावना

- मावळते आयुक्त शेखर सिंह यांना सदिच्छा


पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना 1982 साली झाली. त्यानंतर शहराचे प्रशासकीय प्रमुख म्हणून आजवर 26 आयुक्तांनी काम केले. गेल्या 43 वर्षांमध्ये प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपआपल्या परीने शहराच्या विकासात योगदान दिले आहे. सनदी अधिकारी श्रीकर परदेशी, श्रावण हर्डिकर आणि शेखर सिंह यांची कारकीर्द शहराच्या विकासासाठी  ‘‘एक पाऊल पुढे’’ राहिली आहे, अशी भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची मंगळवारी बदली झाली. त्यांना 2026 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळाची प्रशासकीय जबादारी मिळाली आहे. मार्च-2022 मध्ये सिंह यांची महापालिकेचा पदभार स्वीकारला होता. त्यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट 2025 मध्ये पूर्ण झाला आहे. या निमित्ताने आमदार महेश लांडगे यांनी महापालिका मुख्यालय येथे आयुक्त सिंह यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित कादंबरी भेट दिली आणि नव्या जबाबदारीसाठी शुभसंदेशही दिला. 

आमदार लांडगे म्हणाले की, शहराच्या स्थापनेपासून प्रलंबित असलेले विषय मार्गी लावण्याची धमक शेखर सिंह यांनी दाखवली. प्रशासकीय राजवटीतसुद्धा त्यांनी धाडसी निर्णय घेतले. श्रीकर परदेशी, श्रावण हर्डिकर आणि शेखर सिंह असे शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या आयुक्तांची नावे शहराच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीली जातील. 

वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी, बायोडायव्हर्सिटी पार्क, डीपी रस्त्याचा विकास, आंद्रा-भामा आसखेड प्रकल्पाची अंमलबजावणी, संविधान भवन उभारणी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय उभारणी, महापालिका प्रशासकीय भवन उभारणी, मोशीतील प्रस्तावित 850 बेडचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, ग.दी. माडगुळकर नाट्यगृत उभारणी आणि प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावीपणे केलेली अंमलबजावणी अशी अनेक कामे आयुक्त शेखर सिंह यांनी सकारात्मक भूमिकेतून मार्गी लावली. समाविष्ट गावांच्या विकासाला चालना देण्यात आली, असेही आमदार लांडगे म्हणाले. 

कुदळवाडी अतिक्रमण कारवाई सारख्या कठोर निर्णयांमुळे आयुक्त शेखर सिंह टीकेचे धनी झाले. मात्र, ती कारवाई सरसकट का झाली? याचाही विचार केला पाहिजे. महापालिका विकास आराखड्यातील कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करण्यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. यासह चिखली आणि चऱ्होलीच्या ग्रामस्थांचा विरोध असलेली प्रस्तावित टीपी स्कीम रद्द करण्याचा निर्णयही आयुक्त सिंह यांनी घेतला. त्यामुळे अत्यंत धाडसी निर्णय घेणाऱ्या शेखर सिंह यांची कारकीर्द शहराच्या वाटचालीमध्ये निर्णायक म्हणून अधोरेखित होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या कामगिरीची दखल घेतली. त्यामुळेच त्यांना नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळाची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली असावी. तब्बल 24 हजार कोटी रुपयांचे बजेट असलेला हा सोहळा आयुक्त सिंह यांच्या प्रशासकीय नियंत्रणात होणार आहे, ही निश्चितच उल्लेखनीय बाब आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे. 

प्रतिक्रिया : 

पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट होती. मात्र, या दोलायमान राजकीय व प्रशासकीय स्थितीमध्ये आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासकीय नेतृत्त्वाची चुणूक दाखवली. विकासकामे आणि धोरणात्मक निर्णयाबाबत अनेकदा आमचे मतभेद झाले आहेत. मात्र, शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी कायम सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची भेट घेतली आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. 

- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

थोडे नवीन जरा जुने