बेवारस कुत्र्यांचा धुमाकूळ – यमुना नगर परिसरात नागरिकांचा जीव धोक्यात, पालिकेची ढिम्म भूमिका

 


पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना बेवारस कुत्र्यांच्या त्रासाचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे. विशेषतः यमुना नगर परिसरात कुत्र्यांचा अक्षरशः जनसामुदाय निर्माण झाला असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. तरीदेखील पिंपरी चिंचवड महानगरपालिका मात्र ढिम्म असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

दिवसाढवळ्या नागरिकांवर हल्ले, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडवणे, ज्येष्ठ नागरिकांच्या मॉर्निंग वॉकला अडथळे, सकाळ-संध्याकाळ भीतीचे सावट... अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना चावा घेतल्यानंतर शासकीय दवाखान्यांत उपचार तर दूरच, पण आवश्यक इंजेक्शन सुद्धा वेळेवर उपलब्ध नसल्याने लोकांना खाजगी दवाखान्यांचा आश्रय घ्यावा लागत आहे. सामान्य माणसाचे हाल होत असताना पालिकेचे अधिकारी मात्र कारवाईकडे दुर्लक्ष करीत आहेत.

अनेक वर्षांपासून या संदर्भात तक्रारी होत असूनही कोणतेही ठोस धोरण आखले गेलेले नाही. कामचुकार वृत्तीमुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत. कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांच्या हालअपेष्टा दिवसेंदिवस वाढत आहेत. इतकेच नव्हे तर पाळीव कुत्र्यांना रस्त्यावर मोकळे फिरवून त्यांच्याकडून होणारे दूषित मलमूत्रही गंभीर आरोग्यधोका निर्माण करत आहे.

या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत, यमुना नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. गजानन ढमाले यांनी पालिकेने केवळ आश्वासन न देता तातडीने कठोर व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.

 नागरिकांचा संयम आता संपत चालला असून पालिकेने ठोस पावले उचलली नाहीत तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांकडून दिला जात आहे.

थोडे नवीन जरा जुने