डॉ. बाबा कांबळे यांच्या भूमिकेमुळे ५ मार्चच्या संपाची हवा निघाली

 


पिंपरी-चिंचवड व पुण्यात रिक्षा-टॅक्सी सेवा सुरळीत

ई-चलन पद्धत रद्द करण्याच्या मागणीवर ठाम; जॉइंट ॲक्शन कमिटीसोबत बाबा शिंदे व बाबा कांबळे आता एकत्र लढणार!

पुणे : पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या ई-चलन प्रणाली आणि परवाना रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात आज पुकारण्यात आलेल्या संपाचा शहरातील जनजीवनावर कोणताही परिणाम झाला नाही. महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया या प्रमुख संघटनांनी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा, टॅक्सी आणि व्यावसायिक वाहतूक सेवा सुरळीत सुरू असल्याचा दावा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केला आहे.

प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात डॉ. कांबळे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

१. बोगस संघटनांचा स्टंटबाजीचा प्रयत्न


काही संघटनांनी वैयक्तिक स्टंटबाजीसाठी हा संप पुकारल्याचा आरोप त्यांनी केला. रिक्षाचालक व टॅक्सीचालकांना विश्वासात न घेता केवळ गोंधळ निर्माण करण्यासाठी केलेल्या या आवाहनाला चालकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहिली.

२. मागण्या रास्त; मात्र आंदोलनाची पद्धत चुकीची


ई-चलन प्रणालीतील त्रुटी आणि ३० दिवसांत परवाना रद्द करण्याची नोटीस ही बेकायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. “ही पद्धत रद्द झालीच पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. मात्र चुकीच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सहभागी होऊन चालकांचे नुकसान करणे आम्हाला मान्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

३. बाबा शिंदे आणि बाबा कांबळे एकत्र


या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील नेते बाबा शिंदे आणि डॉ. बाबा कांबळे यांच्यात सविस्तर चर्चा झाली असून दोन्ही नेत्यांतील गैरसमज दूर झाले आहेत. पुढील काळात कष्टकरी चालकांच्या प्रश्नांसाठी जॉइंट ॲक्शन कमिटीच्या माध्यमातून दोघेही एकत्र लढा देणार असल्याचे सांगण्यात आले.

४. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा


मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले असून चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. “मुख्यमंत्री निश्चितच सकारात्मक हस्तक्षेप करतील आणि ई-चलन प्रक्रियेतील जाचक अटींमध्ये सुधारणा करतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

५. चालकांनी अफवांना बळी पडू नये

चालकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनांना आजच्या अयशस्वी संपामुळे चपराक बसली आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या अधिकृत संघटनांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन करण्यात आले.

“आम्ही न्यायासाठी लढणारे लोक आहोत. ई-चलन पद्धतीतील अन्यायाविरोधात आता अधिक ताकदीने सरकारशी चर्चा करू किंवा प्रसंगी न्यायालयीन लढा देऊ.”

— डॉ. बाबा कांबळे
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया

थोडे नवीन जरा जुने