पिंपरी चिंचवड - पिंपळे गुरव व सांगवी परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रभाग क्र. २९ आणि ३१ सोबतच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये तात्पुरते 'पे अँड पार्क' सुरू करून वाहतूक कोंडीची समस्या सोडववण्यात यावी. या माध्यमातून युवकांना रोजगार आणि महापालिकेला आर्थिक फायदा मिळू शकतो, अशी मागणी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी केली आहे.
याबाबत अरुण पवार यांनी महापालिकेच्या वाहतूक व दळणवळण विभागाचे कार्यकारी अभियंते सुनील पवार यांना निवेदन दिले आहे. यावेळी संजय गायके, किशोर अट्टरगेकर, मालोजी भालके, श्रीकृष्ण जाधवर, प्रताप भोसले आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, की स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात वाहन पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे. नागरिक नाइलाजाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपली वाहने पार्क करत आहेत. यामुळे प्रभाग क्र. २९ व ३१, तसेच पिंपरी-चिंचवड शहरासह अनेक भागात तीव्र वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
प्रभाग क्र. २९ (सुदर्शन नगर, सृष्टी चौक, पिंपळे गुरव), प्रभाग क्र. ३१ (नवी सांगवी, जुनी सांगवी), पिंपरी चिंचवड शहरातील आरक्षित असलेल्या मोकळ्या जागांवर तात्पुरत्या स्वरूपाचे पत्र्याचे कंपाऊंड उभे करून त्या ठिकाणी 'पे अँड पार्क' सुविधा सुरू करण्यात यावी.
यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल आणि नागरिकांची सोय होईल. 'पे अँड पार्क' केंद्रांच्या व्यवस्थापनातून शहरातील गरजू युवक-युवतींना रोजगार मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पार्किंग शुल्क आकारणीमुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, असेही अरुण पवार यांनी सांगितले.
