पिंपरी चिंचवड - चिखली घरकुल येथील ज्येष्ठ उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या सुजाता विधाते यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी चिंचवड ओबीसी महिला शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे एका कार्यक्रमात सुजाता विधाते यांना निवड केल्याचे पत्र देऊन अभिनंदन केले.
यावेळी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, राज्य समन्वयक सलीम बेग, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे, समन्वयक विक्रांत पाटील यांनी विधाते यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, ओबीसी शहराध्यक्ष विशाल जाधव, सरचिटणीस संदीप चव्हाण, पिंपरी विधानसभा महिला अध्यक्ष कल्पना घाडगे, सहसचिव अर्चना बारकुल, चिखली घरकुल फेडरेशन सहसचिव निर्जला चौधरी आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सुजाता विधाते यांच्या बाबत माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, शरद पवार यांचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी शहरात संघटन उभारले जात आहे. विधाते यांचे कुटुंब मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. उद्योग, व्यवसाय निमित्त ते पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक झाले आहेत. चिखली घरकुल फेडरेशनच्या स्थापनेमध्ये सुजाता विधाते यांचे मोठे योगदान आहे. अनेक महिला बचत गटांचे त्यांनी संघटन उभारून त्यांना उद्योग, व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन, कर्ज उभारणीस मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष मदत केली आहे. सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात देखील सुजाता विधाते यांचा जनसंपर्क आहे. त्यांचे संघटन कौशल्य विचारात घेऊन त्यांची प्रदेशाध्यक्षांकडे शिफारस केली होती. एका प्रामाणिक व्यक्तीची ओबीसी सेलच्या महिला शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
