- आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पर्यावरणाचा संदेश
पिंपरी-चिंचवड - इंद्रायणी नदी स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या ‘रिव्हर सायक्लोथॉन 2025’ या भव्य उपक्रमाला पुणे- पिंपरी-चिंचवडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. डुडूळगाव, मोशी येथील ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र येथे दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता होणाऱ्या या सायक्लोथॉनसाठी आतापर्यंत २५ हजाराहून अधिक सायकलपटूंची नोंदणी पूर्ण झाली असून, अवघे ५ दिवस शिल्लक असताना आणखी मोठ्या प्रमाणावर नोंदणी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती समन्वयक डॉ. निलेश लोंढे यांनी दिली.
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी भोसरी येथील गावजत्रा मैदानावर होणारा सायक्लोथॉन यंदा प्रथमच नव्या, अधिक प्रशस्त आणि सुव्यवस्थित ठिकाणी मोशी येथे आयोजित केली जात आहे. पुणे–नाशिक महामार्गालगतचे हे ठिकाण मोठ्या सहभागासाठी अधिक योग्य असल्याने, आयोजकांकडून ३५ हजाराहून अधिक सायकलपटूंच्या सहभागाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे गतवर्षी या सायक्लोथॉनची -जगातील सर्वात लांब सायकल रांग’ म्हणून ‘गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. आता पुन्हा एकदा यंदाची सायक्लोथॉन नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या उपक्रमाचे संयुक्त आयोजन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र, WTE फाउंडेशन आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन करीत असून, पर्यावरण संवर्धन, आरोग्य आणि नदी स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोचवणे हा उद्देश आहे. उपक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे.
प्रतिक्रिया :
“ रिव्हर सायक्लोथाॅनमध्ये २५ हजार सायकलपटूंनी नोंदणी करून दिलेला प्रतिसाद प्रेरणादायी आहे. आता उरलेले पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. अधिकाधिक नागरिकांनी यात सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश संपूर्ण जगापर्यंत पोहोचवावा. मोशी येथील नव्या ठिकाणी सर्व सुविधा, सुरक्षा व पार्किंगची योग्य व्यवस्था केली आहे. चला, इंद्रायणी नदीसाठी, पर्यावरणासाठी आणि भावी पिढ्यांसाठी एकत्र येऊ आणि नवा इतिहास घडवूया.”
- डॉ. निलेश लोंढे, मुख्य समन्वयक, रिव्हर सायक्लोथॉन.
