PCMC: संविधानाबद्दल आदर आणि जागरूकता वाढविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा – संविधान अभ्यासक नुरखॉं पठाण..

         


                                                                   

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मुख्याध्यापकांसाठी संविधान विषयक विशेष व्याख्यान संपन्न....

"घर घर संविधान" हा उपक्रम सर्व शाळांमध्ये  राबविण्यात येणार...

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) :  विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर आणि जागरूकता वाढविण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने बांधील राहिले पाहिजे,संविधान हा राष्ट्रग्रंथ असून हा भाव प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात दृढ करावा, असे प्रतिपादन संविधान अभ्यासक नुरखॉं पठाण यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संविधान दिन (२६ नोव्हेंबर) पार्श्वभूमीवर महापालिका शाळांतील सर्व मुख्याध्यापकांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन चिंचवड स्टेशन येथील ॲटो क्लस्टर येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमास महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, महापालिकेच्या विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सामूहिक वाचनाच्या माध्यमातून संविधानातील मूल्ये, तत्त्वे आणि नागरिकांच्या कर्तव्यांची जाणीव पुनः अधोरेखित करण्यात आली. त्यानंतर संविधान अभ्यासक पठाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संविधान म्हणजे काय, नागरिकांचा संविधानाशी असलेला संबंध, दैनंदिन जीवनातील संविधानाचे स्थान आणि महत्त्व, संविधानाचा उपयोग, तसेच स्वातंत्र्य संग्रामातील राजकीय, सामाजिक आणि सामाजिक लढा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. संविधान निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, मसुदा समितीचे योगदान, तसेच भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये यांचेही त्यांनी सखोल विश्लेषण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर प्रास्ताविक प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी केले.

----- 

भारतीय संविधान या देशातील चरा चराचे संरक्षण व संवर्धन करणारे आहे. संविधानातील मूल्ये ही केवळ अभ्यासाचा भाग नसून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वर्तनात दिसली पाहिजेत. शिक्षकांनी या मूल्यांची बीजे विद्यार्थ्यांच्या मनात रोवली, तर समाजातील लोकशाही संस्कार अधिक दृढ होतील.

– अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

…..

संविधान हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचे प्राण आहे. महापालिका शाळांमधील प्रत्येक विद्यार्थी संविधानातील मूल्यांना जाणून वाढला, तर समाज अधिक मजबूत बनेल. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये समानता, न्याय, बंधुता आणि स्वातंत्र्य यांसारख्या मूलभूत मूल्यांचे संजीवनीरूप संस्कार करावेत, हीच संविधान दिनाची खरी प्रेरणा आहे, तसेच "घर घर संविधान" हा उपक्रम सर्व शाळांमध्ये  राबविण्यात येणार आहे.

 – किरणकुमार मोरे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका            


          

थोडे नवीन जरा जुने