राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; तापकीर दांम्पत्य अखेर भाजपात!


 

- भाजपाच्या पॅनेलचा प्रचार करणार, चारही उमेदवार निवडून आणणार : विनया तापकीर

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मधील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका विनया तापकीर आणि प्रभावशाली सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तापकीर यांनी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वात भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. 

विशेष म्हणजे, आमदार महेश लांडगे देतील त्या उमेदवारांचे काम आम्ही करणार आहोत. चऱ्होलीच्या विकासात योगदान आम्ही दिले असून, आगामी काळात आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वात आणखी विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वास माजी नगरसेविका विनया तापकीर यांनी व्यक्त केला आहे. 

पिंपरी-चिंचवड भाजपा मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय येथे तापकीर दांम्पत्याचा जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे आणि माजी नगरसेवक उल्हास शेट्टी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मोशी गावठाण, गंधर्वनगरी, संत ज्ञानेश्वरनगर भाग, साई मंदिर परिसर, गोखले मळा, अलंकापुरम सोसायटी, वडमुखवाडी, काळजेवाडी, पठारेमळा, ताजणेमळा, चोवीसावाडी चहोली, डुडुळगाव या परिसरात आणि प्रभाग क्रमांक 4 मधील काही भागात आता भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तापकीर म्हणाले की, 2014 पासून आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वामध्ये चऱ्होलीसह समाविष्ट गावांमध्ये चांगला विकास होतो आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्यावर आम्ही भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही भाजपाचे पॅनेल निवडून आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शहरात दौरा केला. ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्याचवेळी भाजपाच्या पक्ष कार्यालयात माजी नगरसेविका विनया तापकीर आणि प्रदीप तापकीर यांनी भाजपाचे ‘कमळ’ हाती घेतले. यापूर्वीच मुंबईच येथील पक्षप्रवेश कार्यक्रमात आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वात तब्बल 22 माजी नगरसेवक, माजी महापौर, उपमहापौर यांनी भाजपात प्रवेश केला होता. 

प्रतिक्रिया:

चऱ्होली आणि परिसरात माजी नगरसेविका विनया तापकीर आणि कुटुंबियांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात योगदान दिले आहे. चऱ्होलीचा सर्वांगीन विकासाचा विचार घेवून त्यांनी भाजपाची विचारधारा स्वीकारली आहे. भाजपा परिवारात त्यांचे स्वागत करतो. त्यांचा पक्षामध्ये कायम आदर होईल. तसेच, सर्वांनी एकजुटीने शहराच्या शाश्वत विकासाच्या वाटचालीमध्ये सक्रीय योगदान देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. 

- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

थोडे नवीन जरा जुने