- उत्तर पुणे जिल्हा निवडणूक प्रमुख आमदार महेश लांडगे यांनी मानले मतदारांचे आभार
- पुणे ग्रामीण भागात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचे फुलले ‘कमळ’
पिंपरी-चिंचवड - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने दिमाखदार यश संपादन करत आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या महायुतीने राज्यभर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
राज्यातील २८८ नगरपरिषदांपैकी २१४ हून अधिक नगराध्यक्ष पदांवर भाजपाच्या महायुतीने विजय मिळवला असून, भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या यशाबद्दल पिंपरी-चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
पुणे जिल्ह्यातील उत्तर पुणे जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडताना पक्ष संघटना, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एकजूट आणि विकासकेंद्रित मुद्द्यांमुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरल्याचे आमदार लांडगे यांनी स्पष्ट केले.
विशेषतः श्री क्षेत्र आळंदी नगरपरिषदेत भाजपाने जोरदार मुसंडी मारत २१ पैकी १५ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच नगराध्यक्षपदी प्रशांत पोपट कुऱ्हाडे यांनी बहुमताने विजय मिळवला, हा भाजपासाठी ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
‘‘विकासाभिमुख हिंदुत्व’’ या भूमिकेला मतदारांनी दिलेला स्पष्ट कौल भाजपाच्या धोरणांवरील विश्वास दर्शवतो, असे आमदार लांडगे म्हणाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यभूमीत मिळालेला हा विजय भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांना समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले. आळंदीतील या महाविजयाची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीतही होईल, असा ठाम विश्वास आमदार लांडगे यांनी व्यक्त केला. शेवटी त्यांनी राज्यातील सर्व विजयी उमेदवारांचे पुन्हा एकदा अभिनंदन केले.
प्रतिक्रिया :
“राज्यातील जनतेने विकास, स्थैर्य आणि पारदर्शक प्रशासनावर विश्वास व्यक्त केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेला हा कौल आम्हाला अधिक जबाबदारीने काम करण्याची ताकद देतो. आळंदीपासून पिंपरी-चिंचवडपर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत, विकासाभिमुख आणि लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्यातील या निवडणुकीच्या निकालांची पुनावृत्ती निश्चितपणे पिंपरी-चिंचवड महापालिकेत होईल, असा विश्वास आहे.
- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
