उपमुख्यमंत्री पवार यांचा ‘वार’; आमदार लांडगे यांचा ‘पलटवार’



पिंपरी-चिंचवडमध्ये पाच दिग्गजांचा भाजपात प्रवेश

 भाजपाचा राष्ट्रवादीला शहरात आणखी एक धक्का

पिंपरी चिंचवड - शहरात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सध्या प्रवेश-प्रतिप्रवेशाच्या राजकारणाला वेग आला असताना पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आमदार महेश लांडगे यांनी जोरदार राजकीय पलटवार केला आहे. आकुर्डी- काळभोरनगर प्रभागातील शेट्टी कुटुंबियांनी राष्ट्रवादीची साथ सोडली आणि आमदार लांडगे यांच्या नेतृत्त्वामध्ये भाजपात प्रवेश केला आहे.

शहरातील हॉटेल व्यावसायिक संघटना आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत कुटुंबाने दोन-चार टर्म नगरसेवक तथा महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. उल्लास शेट्टी, प्रसाद शेट्टी यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. शेट्टी यांचे बंधू जगदीश शेट्टी हे राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात.

तसेच, दिवंगत खासदार गजानन बाबर यांचे बंधू माजी नगरसेवक प्रकाश बाबर, माजी नगरसेविका शारदा बाबर, अमित प्रकाश बाबर, एैश्वर्या बाबर यांनीही भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. अमित बाबर हे माजी नगरसेवक प्रकाश बाबर यांचे सुपुत्र असून सांगली–सातारा–कोल्हापूर मित्र मंडळाचे ते सक्रिय सदस्य म्हणून परिचित आहेत. सामाजिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक कार्यात त्यांचा सहभाग उल्लेखनीय राहिला आहे.

यावेळी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे,  शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, दक्षिण भारत आघाडीचे प्रमुख राजेश पिल्ले, सरचिटणीस शितल शिंदे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, राजु मिसाळ, प्रशांत शितोळे, शांतराम बापू भालेकर, राजु दुर्गे आदी उपस्थित होते. माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी, अनुराधा गोफणे, सामाजिक कार्यकर्ते देवीदास गोफणे, अमित बाबर आणि महेश सहकारी बँकेचे अजय लढ्ढा, महेश काटे, संजय जगताप, लवकुश यादव, चेतन शेटे, गणेश कंकावणे, ऋिषी शेट्टी यांच्या प्रवेशामुळे भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.

मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये चिंचवडमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. कलाटे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतील अशी अपेक्षा होती. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीला राजकीय धक्का मानला जातो.  ‘‘शहरातील निर्णय शहरात घेतले जातात’’  यावर पुन्हा एकदा आमदार महेश लांडगे यांनी अधोरेखित केले आहे.

प्रतिक्रिया :

“राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये ‘शतप्रतिशत भाजपा’ असा ठाम संकल्प आम्ही केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपात प्रवेश करीत आहेत. सर्वजण एकत्रितपणे पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासासाठी योगदान देणार आहोत.

महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

थोडे नवीन जरा जुने