गरिबांचे धान्य लुटणारी रेशन दुकानदारांची टोळी उध्वस्त करा ... धनाजी येळकर पाटील



छावाच्या वतीने मेरा रेशन मेरा अधिकार जनजागृती मोहीम

पिंपरी चिंचवड - पिंपरी चिंचवड शहरातील अ व ज या अन्न व पुरवठा विभागाच्या शासन मान्य स्वस्त धान्य दुकानातून रेशन कार्ड धारकांना शासन निर्धारित नियमानुसार प्रत्येक कार्ड ग्राहकाला त्याच्या कुटुंबातील सदस्य संख्येनुसार प्रत्येक व्यक्तीस ५ किलो असे धान्य न देता प्रत्येक वेळी धान्याची कपात करून कमी धान्य दिले जात आहे.अशा बऱ्याच तक्रारी छावा मराठा युवा महासंघाकडे येत आहेत. हे छावा संघटनेच्या वतीने अधिकाऱ्यांना १६ सप्टेंबर २०२५ रोजी निवेदनाद्वारे कळवण्यात आले होते.या संदर्भात अनेक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा यावर ठोस निर्णय घेतला गेला नाही. गरीब जनतेची लूट चालूच आहे.गरिबांच्या तोंडचा घास काढून हे धान्य काळया बाजारात विकले जात आहे.त्यामुळे संघटनेने आता आक्रमक भूमिका घेत प्रत्येक दुकानावर जाऊन हे प्रकार रोखण्याचे ठरवले आहे.

  इ पॉस मशीन द्वारे बायोमेट्रिक पद्धतीने थंब घेऊन धान्य दिले जाते पण काही मोजके स्वस्त धान्य दुकानदार काही मोजक्याच कार्ड धारकांना थंब घेऊन ई पॉस प्रणालीद्वारा निघणारी पावती देतात बाकी सर्रास दुकानदार ती पावती देत नाहीत. यामुळे कार्ड धारकाला आपले धान्य कमी येऊनही त्यांना जाब विचारता येत नाही,त्याची तक्रार करता येत नाही.

तसेच ग्राहकाने थंब दिल्यानंतर इ पॉस पावतीची मागणी करून सुद्धा त्याला त्याची पावती न देता त्यांचे रेशन बंद करण्याची उद्धटपणे धमकी दुकानदारांकडून दिली जाते.त्यामुळे हे गरीब ग्राहक अधिकाऱ्याकडे तक्रार करीत नाहीत.तर काही दुकानदार आम्हाला पावती न देण्याचा वरून अधिकाऱ्याकडून आदेश असल्याचे उघड सांगत आहेत.त्याचा पुरावा सुद्धा अधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.त्यामुळे पुरवठा प्रशासना विरोधात या भ्रष्टाचाराबाबत जनतेच्या तक्रारी व रोष वाढत आहे.नियमापेक्षा धान्य कमी देणाऱ्या  दुकानदारावर कारवाई होत नसेल तर  संबंधित अधिकाऱ्यांची सुद्धा याला मूक संमती आहे असाच याचा अर्थ होतो.त्यांच्याच आशीर्वादाने ही सामान्य जनतेची लूट चालू आहे.या सर्व प्रकाराची छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यता पडताळून पहिलेली आहे. त्याचे पुरावे सुद्धा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.त्यामुळे छावा संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक दुकानावर जाऊन रेशन कार्ड धारकांशी संवाद साधून *मेरा रेशन मेरा अधिकार* हे रेशनकार्ड धारकांसाठी जनजागृती अभियान सोमवार दिनांक ८ डिसेंबर २०२५ पासून सर्व रेशन दुकानावर राबवण्यात येणार आहे.ज्यामुळे गरीब आणि गरजू कुटुंब आपल्या हक्काच्या धान्यापासून वंचित राहणार नाहीत,त्यांच्या अधिकाराची आणि हक्काची माहिती या अभियानाच्या माध्यमातून करून दिली जाणार आहे. तसेच जे रेशन दुकानदारावर शासन नियमात वागणार नाहीत.अशा दुकानदारावर त्यांचे परवाने रद्द करून कायदेशीर कठोर कारवाई करावी अन्यथा छावा स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. हे आंदोलन संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल असे संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील निलंगेकर म्हणाले.

 अ झोन चे पुरवठा अधिकारी विजयकुमार क्षीरसागर तर ज झोन चे प्रदिप डंगारे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी छावा प्रमुख  धनाजी येळकर पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष राजेश गुंड, प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील निलंगेकर, पुणे पूर्व चे जिल्हाध्यक्ष महेंद्र शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने