शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या योद्ध्याचा सन्मान
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी जनहित फाऊंडेशन, आळंदी देवाची व पसायदान गुरुकुल पंचमुखी शिक्षा पद्धती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अप्पा साहेब कड यांच्या ६५व्या वाढदिवसा निमित्त त्यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या अतुलनीय सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.
शेतकरी कुणबी मराठा संघ संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब कड यांना जीवन गौरव पुरस्कार उत्तरप्रदेश लखनव चे माजी आमदार चंद्रिका प्रसाद, आळंदी जनहित फाउंडेशन सचिव रामदास दाभाडे, शालेय वारकरी संप्रदायातील साधक मुले यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी संयोजक योगेश वाघ गुरुजी, आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे विश्वस्त व जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी विश्वनाथ पोटवडे, शिवाजी घारे, दत्तशेठ लोणारी, गौतम पाटोळे, हमीद शेख, दिनकर तांबे, कैवल्य टोपे, रामेश्वर महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अप्पा साहेब कड हे शेतकरी कुणबी मराठा संघाचे अध्यक्ष असून, त्यांनी संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या न्यायासाठी अखंड लढाईत अर्पण केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष करताना त्यांनी स्वतःचे सुख, वेळ व आयुष्य बाजूला ठेवत केवळ समाजाच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले. त्यांची लढण्याची ताकद, जनतेसाठीची करुणा आणि शेतकऱ्यांना स्वतःच्या कुटुंबासारखे मानण्याची वृत्ती यामुळे ते शेतकऱ्यांचे खरे पोशिंदे, मार्गदर्शक आणि आधारवड म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यामुळे अनेक संकटग्रस्त कुटुंबांना आधार मिळाला, अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले आणि समाजात सकारात्मक बदल घडवत त्यांनी अनेकांना नवजीवन दिले. त्यांच्या हस्ते डॉ. कड यांना सन्मानचिन्ह व मानपत्र प्रदान करण्यात आले.आप्पासाहेब कड यांच्या मार्गशीर्ष पौर्णिमा जन्म दिनाचे औचित्य साधत जीवन गौरव पुरस्कार व मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मान सोहळ्यानंतर सिद्धबेट येथे वृक्षारोपण करण्यात आले आणि पसायदान गुरुकुलातील बालगोपालांना स्नेहभोजन सुग्रास मेजवानी देऊन वातावरण आनंदमय झाले.
डॉ. अप्पा साहेब कड यांची सेवा, त्याग आणि संघर्षाची परंपरा ही केवळ एका व्यक्तीची कहाणी नाही.
ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जिवनातील आशा, लढाई आणि जगण्याचा प्रकाश आहे. त्यांचा हा सन्मान म्हणजे एका व्यक्तीचा नव्हे तर शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा विजय आहे. या वेळी विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त करीत जिरवण गौरव पुरस्कार करीत पुरस्काराची उंची वाढल्याचे मान्यवरांनी सांगितले.
प्रास्ताविक संयोजक अर्जुन मेदनकर यांनी केले. आभार योगेश वाघ गुरुजी यांनी मानले.
