प्रमोद कुराडे उप तालुका प्रमुख शिवसेना व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची लिंगनूरमध्ये मागणी
मुरगूड : जवाहर सिंचन विहीर अंतर्गत अनुदान जुन्या विहिरीवर दाखवून नव्याने शासनाची पाच लाखाची फसवणूक करणाऱ्या माजी सरपंच मयुर उर्फ राहुल आवळेकर, नेताजी सखाराम आवळेकर, अमर एकनाथ आवळेकर, प्रियांका राहुल आवळेकर तसेच धनाजी शिवाजी जाधव यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी उप तालुका प्रमुख शिवसेना चे प्रमोद कुराडे व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची लिंगनूरमध्ये केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, लिंगनूर (कापशी) ता. कागल या गावातील माजी सरपंच, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कागल तालुका अध्यक्ष, मयूर उर्फ राहुल नेताजी आवळेकर याने आपल्या पदाचा गैरवापर करत शासकीय अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी धनाजी जाधव याला हाताशी धरून संगनमताने आपल्या वडिलांच्या नावावर असलेल्या व 2016 /17 ला काढलेल्या जुन्या विहिरीवर लाभ उचलला आहे. सदर जवाहर सिंचन विहिरीचे अनुदान घेत असताना 24 नोव्हेंबर 2022 चा मार्गदर्शक तत्वांना तिलांजली देण्याचे काम पंचायत समिती , कागल व लिंगणूर (कापशी) येथील अधिकारी आणि कर्मचारी यांनी केला आहे, असा आरोप शिवसेना उपतालुकाप्रमुख व माजी सरपंच प्रमोद आण्णासो कुराडे यांनी यावेळी केला. कॉम्रेड विलास भोसले यांनी यावेळी सांगितले की , लाभार्थ्यांने जॉब कार्ड 7 मे 2025 रोजी काढले आणि 8 मे 2025 रोजी प्रस्तावाला मंजुरी मिळाली. एका दिवसात ग्रामसभेचा ठराव झाला कधी? ग्रामपंचायतेने तो प्रस्ताव पंचायत समितीच्या पाठविली कधी? आणि पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कागदपत्रे तपासून एका दिवसात मंजुरी दिली कशी? अशी कार्यतत्परता सर्वसामान्य लोकांना दिलेली दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. अजित नानासो घाटगे यांनी यावेळी बोलताना सांगितले की अमर एकनाथ आवळेकर, जे ग्रामरोजगर सेवक आहेत व लाभार्थ्यांचे पुतणे आहेत यांनी हे काम बेकायदेशीर आहे हे माहीत असूनही जाणीवपूर्वक शासनाची फसवणूक करून नेताजी सखाराम आवळेकर, राहुल नेताजी आवलेकर, प्रियांका राहुल आवळेकर व स्वतः अमर एकनाथ आवळेकर यांनी लाभ उटवलेला आहे. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी व ग्रामस्थांनी अशी मागणी केली की या प्रकरणाची तत्काळ सखोल चौकशी करावी.
यावेळी त्यांच्यासोबत कॉम्रेड नामदेव भोसले, काॅम्रेड तुषार किल्लेदार, विकास यादव, दादासो पाटील, सुरेश कुराडे तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शरद पवार गट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
.png)