पिंपरी चिचंवड - सर्वसामान्य नागरिक कामगार यांना परवडणारा सोयीचा आणि आवडीचा खाद्यपदार्थ म्हणजे वडापाव. महाराष्ट्र राज्यामध्ये चवीने खाल्ला जाणारा वडापाव टेस्ट ॲटलसच्या जागतिक क्रमवारीत ५ व्या स्थानावर झळकला आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वोत्तम खाद्यपदार्थांच्या १०० च्या क्रमवारीत ५ वे स्थान हे रस्त्यावरील हातगाडी, स्टॉल धारकांचे यश असून चविष्ठ पदार्थ बनवणे याचे श्रेय त्यांना जाते, त्यामुळे हातगाडी, स्टॉल धारकांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज व्यक्त करत त्यांचे कौतुक केले.
जागतिक दर्जामध्ये मुंबईचा वडापाव ५ व्या क्रमांकावर आल्यामुळे मुंबईची आणि महाराष्ट्र राज्याची ओळख जागतिक स्तरावर एक खाद्यपदार्थांचे शहर म्हणून निर्माण झाली आहे. ‘बेस्ट फूड सिटीज इन द वर्ल्ड' यादीत मुंबईच्या वडापावने टेस्ट ॲटलस (TasteAtlas) या लोकप्रिय खाद्यपदार्थ मार्गदर्शकाने या क्रमवारी जाहीर केल्या. यात वडापाव हे जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत स्थान मिळवणारे एकमेव भारतीय पदार्थ आहे.
रस्त्यावर विक्री करणाऱ्या पथारी, हातगाडी, स्टॉल धारकांच्या खाद्यपदार्थाच्या बाबतीमध्ये वडापाव, मिसळपाव, भेळ आणि पाणीपुरी यासह समोसे, चहा अशा पदार्थांना सर्वसामान्य नागरिक आणि ज्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे अशा लोकांना हे महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरते. नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ व पथ विक्रेता समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांकडून पथ विक्रेता कायद्याची अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू आहेत ते झाल्यास या विक्रेत्यांना अधिक मोठा दर्जा तसेच संधी प्राप्त होईल असेही नखाते यांनी नमूद केले आहे.
