Iran protest: इराणमध्ये अशांतता दिवसेंदिवस वाढत आहे. कट्टरपंथी सत्तेविरोधात जनतेचे आंदोलन सलग सातव्या दिवशीही सुरू असून परिस्थिती बंडखोरीसारखी झाली आहे. देशातील 50 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाची झळ पोहोचली आहे. आंदोलक आणि सुरक्षादलांमध्ये अनेक ठिकाणी चकमकी झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत 8 जणांचा मृत्यू झाला असून डझनभर लोक जखमी झाले आहेत. शहरागणिक लोक रस्त्यावर उतरले आहेत.
हमादान प्रांतातील असदाबाद येथे आंदोलकांनी आयातुल्ला अली खामेनेई यांच्या अधीन असलेल्या इराणी रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या तळावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. या आंदोलनामागे इराणची ढासळलेली अर्थव्यवस्था हे प्रमुख कारण आहे. अनेक आंदोलक सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामेनेई यांच्या विरोधात घोषणा देताना दिसले, तर काहींनी राजेशाही पुन्हा बहाल करण्याची मागणी केली.
इराणच्या क्राउन प्रिन्सने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानत सांगितले की त्यांच्या “भक्कम नेतृत्व आणि पाठिंब्यामुळे” इराणमधील सरकारविरोधी आंदोलकांचा आत्मविश्वास वाढला आहे. गेल्या 46 वर्षांपासून सुरू असलेले शासन संपवू इच्छिणाऱ्या आंदोलकांचा आपण संदेशवाहक असल्याचे त्यांनी सांगितले. इराणमध्ये “स्थिर संक्रमण” घडवून आणण्यासाठी आपल्याकडे स्पष्ट योजना असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, प्रदेशात शांतता आणि समृद्धी पुनर्स्थापित करण्यासाठी अमेरिकेसोबतचे संबंध पुन्हा मजबूत करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
