आळंदी येथे आमलकी एकादशीला भाविकांची मोठी गर्दी

 


आळंदी ( अर्जुन मेदनकर) : अलंकापुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदी येथे आमलकी एकादशी निमित्त माऊली मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. सुमारे पन्नास हजारांहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. पहाटे वेदमंत्रांच्या जयघोषात पवमान अभिषेक संपन्न झाला.

 त्यानंतर दिवसभर हरिनाम गजर, नगरप्रदक्षिणा, प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.

मंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली होती. दुपारच्या फराळाच्या महानैवेद्यासह रात्रीची धुपारती परंपरेनुसार झाली. वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी दर्शनापूर्वी इंद्रायणी नदी घाटावर स्नान व आचमनासाठीही गर्दी केली.

इंद्रायणी आरती उत्साहात

इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने हरिनाम गजरात आरती पार पडली. इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन तसेच महिला बचत गटांच्या सदस्यांनी सहभाग घेतला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरतीनंतर पसायदान व प्रसाद वितरण करण्यात आले.

इंद्रायणी नदीचे पावित्र्य जपण्यासाठी आणि प्रदूषणमुक्तीसाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले. आरतीपूर्वी घाट परिसरात स्वच्छता अभियानही राबविण्यात आले.

वाहतूक व सुरक्षा व्यवस्था

एकादशी निमित्त मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती लक्षात घेऊन पोलीस प्रशासन व मंदिर व्यवस्थापनाने विशेष नियोजन केले होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या. बेकायदेशीर पार्किंग आणि नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

नगरपरिषदेकडून बांधकामांमधील पार्किंग जागांचा योग्य वापर करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले.

एकूणच, आमलकी एकादशी निमित्त आळंदी येथे धार्मिक वातावरणात भक्तिभाव, शिस्तबद्ध नियोजन आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

थोडे नवीन जरा जुने