पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : महानगरपालिका आरोग्य विभाग आणि मानवी हक्क संरक्षण आणि जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने समतानगर व गणेशनगर परिसरात पथनाट्याद्वारे स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. “जीवनात स्वच्छतेत ईश्वर दडलेला असतो” हा संदेश देत नागरिकांना कचरा विलगीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
“ओला–सुका हा कचरा,
विलगीकरण करू या!
पिंपरी चिंचवड शहराला,
देशात नंबर वन करू या!”
अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.
कचऱ्याचे ५ प्रकारांत वर्गीकरण
शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी कचरा पुढील पाच प्रकारांत वर्गीकृत करण्याचे आवाहन केले:
ओला कचरा: शिळे अन्न, खरकटे, फळे–भाज्यांची साले, चहा पावडर, मासे, मांस, हाडे, अंड्यांची टरफले, पालापाचोळा, नारळाच्या करवंट्या, नासलेले अन्नपदार्थ.
सुका कचरा: कागद, पुस्तके, पुठ्ठा, फुटकी भांडी, कप-बश्या, रबर, टायर, लाकडाचे तुकडे.
घातक कचरा: बॅटरी सेल, औषधांच्या रिकाम्या बाटल्या, बल्ब, ट्यूबलाईट, रंगाचे डबे, जंतुनाशके, केमिकल स्प्रे, डिओड्रंट/क्लिनरच्या बाटल्या.
सॅनिटरी कचरा: वापरलेले डायपर, सॅनिटरी नॅपकिन्स, जखमेवरील पट्ट्या, घरगुती सिरिंज.
प्लास्टिक कचरा: पाण्याच्या व सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या, दूध–तेलाच्या पिशव्या, कॅरीबॅग्स, प्लास्टिक कप, स्ट्रॉ, चमचे, प्लास्टिक खेळणी.
“प्लास्टिकच्या कचऱ्याला लावू नका काडी, घरी येईल घंटागाडी” असे सांगत त्यांनी वर्गीकृत कचरा स्वतंत्रपणे घंटागाडीतील कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्याचे आवाहन केले. घंटागाडीवरील महिला सफाई कामगारांच्या आरोग्याचा विचार करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘माझी वसुंधरा’ अभियानातील यश
पालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण संरक्षण, कचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन व ऊर्जा बचत याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली. या प्रयत्नांचे फलित म्हणून पालिकेला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला असून, याचे श्रेय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सहकार्याला जाते.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे यांनी नागरिकांना घातक, ओला व सुका कचरा वेगळा करून पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. “नागरिकांना काही अडचणी असल्यास आम्ही मदतीसाठी सदैव तयार आहोत,” असे त्यांनी सांगितले. तसेच ५०० वर्षे नष्ट न होणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
सा.का. शिवानंद तालीकोटी यांनी घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
उपस्थित मान्यवर
यावेळी सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने, आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, उपाध्यक्ष काळूराम लांडगे, राजगुरुनगर अध्यक्ष शंकर नानेकर, ज्ञानेश्वर रंधे, शिवानंद तालीकोटी, अरविंद मांगले, प्रताप देवडकर, वसंत चकटे, दिपा खराडे, आरोग्य मुकादम राजाराम राखपसारे, अरुण जगताप, झोनल प्रमुख धिरज फणसे, वॉर्ड इंचार्ज सुनिल धावारे, पूजा जाधव, आशा गायकवाड, अलका लोंढे, प्रीती कोरी, अंकुश कांबळे, रोहित सुरवसे, सागर देवकर, गणेश तारडे, साहेब सूर्यवंशी, सुनील गोहिरा, सुनील नरसिंगे तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी पूजा जाधव यांनी उपस्थित नागरिक व महिलांना स्वच्छतेची शपथ दिली. अण्णा जोगदंड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
