Cyber crime: 6.16 कोटींच्या ऑनलाईन गुंतवणूक घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्य आरोपी अटकेत

 


भुवनेश्वर : ओडिशा क्राइम ब्रँचच्या सायबर पोलिसांनी बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ZAIF च्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या मोठ्या ऑनलाईन गुंतवणूक फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

ही फसवणूक तेव्हा उघडकीस आली, जेव्हा फेसबुकद्वारे एका महिलेनं एका व्यावसायिकाशी संपर्क साधला. तिने स्वतःची ओळख संजना श्रीनिवासन, हाँगकाँगस्थित IBM मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून करून दिली. विश्वास संपादन केल्यानंतर तिने व्हॉट्सअॅपवर संभाषण सुरू केले आणि ZAIF नावाच्या क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर खाते उघडण्यास प्रवृत्त केले.

23 मे ते 24 जून या कालावधीत पीडिताने तिच्या सूचनेनुसार विविध बँक खात्यांमध्ये 6.16 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली.

इन्स्पेक्टर राजेंद्र भोला यांच्या नेतृत्वाखालील तपासात उघड झाले की पीडिताला अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने या फसवणुकीत अडकवण्यात आले होते. जेव्हा पीडिताने आपली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्याकडे शिल्लक रकमेच्या 20 टक्के अतिरिक्त रक्कम भरण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर त्याने 89 लाख रुपये आणखी जमा केले, मात्र तथाकथित “रिस्क कंट्रोल टीम” ने एकामागोमाग एक कारणे देत रक्कम देण्यास टाळाटाळ केली.

यानंतर पीडिताच्या लक्षात आले की तो अज्ञात सायबर ठग, ZAIF ट्रेडिंग कंपनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रचलेल्या सुनियोजित कटाचा बळी ठरला आहे. त्यानंतर त्याने सायबर क्राइम पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली.

पीडिताच्या तक्रारीवरून कारवाई करत पोलिसांनी तपास सुरू केला आणि आंध्र प्रदेशातून वेदगिरी श्रीनिवासराव (वय 39) याला अटक केली. त्याच्याकडून मोबाईल फोन, सिम कार्डसह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणात यापूर्वीच तपास अधिकाऱ्यांनी सहा आरोपींना अटक केली असून, त्यापैकी पाच जण सूरत (गुजरात) येथील तर एक लुधियाना (पंजाब) येथील आहे.

सायबर क्राइम पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सोशल मीडिया व मेसेजिंग अ‍ॅप्सवर येणाऱ्या अनाहूत गुंतवणूक प्रस्तावांपासून सावध राहावे, गुंतवणुकीपूर्वी संबंधित व्यक्ती व प्लॅटफॉर्मची सखोल चौकशी करावी आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास 1930 सायबर हेल्पलाईन किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार नोंदवावी.


थोडे नवीन जरा जुने