!-- afp header code starts here --> PCMC : कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजित पवार यांच्या आठवणी

PCMC : कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजित पवार यांच्या आठवणी

 


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यकाळातील निर्णयक्षम, प्रशासकीय पकड असलेल्या नेतृत्वाच्या आठवणींना कष्टकरी कामगारांनी आज उजाळा दिला. सर्वसामान्य नागरिक आणि कामगारांबाबत असलेली त्यांची आपुलकी, तसेच “काम होणार असेल तर होणारच आणि न होणारे होणारच नाही” अशी ठाम भूमिका यामुळे ते कामगार वर्गात विशेष आदराने ओळखले जात होते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सुनिता पोतदार म्हणाल्या, “विषय कोणताही असो, त्यावर त्वरित भूमिका मांडणे आणि संबंधित मुद्द्यांचा सखोल अभ्यास करून निर्णय घेणे ही अजितदादांची कार्यशैली होती.”

राजेश माने यांनी सांगितले, “निवेदन दिल्यानंतर ते तात्काळ स्वीय सहाय्यकांना संबंधित विभागाकडे कार्यवाहीचे आदेश देत असत.”

माधुरी जलमूलवार म्हणाल्या, “घरेलू कामगारांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी घरेलू कामगार कल्याणकारी महामंडळासाठी तरतूद केली.”

इरफान चौधरी यांनी नमूद केले, “फेरीवाला कायद्याबाबत निवेदन दिल्यानंतर ते नेहमी प्रश्न समजून घेऊन पुढील कार्यवाही करत असत.”

राम बिराजदार म्हणाले, “रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्यानंतर अजितदादांनी तातडीने आरटीओ विभागाला आवश्यक सूचना दिल्या.”


राजू बिराजदार म्हणाले, “कामगार, कष्टकरी आणि असंघटित घटकांच्या न्यायासाठी ठामपणे बोलणारे नेतृत्व आजच्या सार्वजनिक जीवनात दुर्मीळ होत चालले आहे.” कामगारांनी आपल्या भावना व्यक्त करत अजितदादांच्या कार्यपद्धतीच्या आठवणींना उजाळा दिला.

अजित पवार यांच्या कार्यकाळातील प्रशासनावरची पकड आणि निर्णयक्षमता यामुळे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात निर्माण झालेली उणीव दीर्घकाळ जाणवत राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, घरेलू कामगार संघर्ष महासंघ, बांधकाम कामगार महासंघ, कष्टकरी रिक्षा-टॅक्सी महासंघ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर, किसन भोसले, सचिव तुषार घाटोळे, अनिल बारवकर, इरफान चौधरी, सुनील भोसले, लता भोसले, वंदना चव्हाण, अनिता मुळे, विजया भोसले आदी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने