PCMC : बौद्धिक दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी पालकांची जागृती


पिंपरी चिंचवड : पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व साई संस्कार संस्था, संभाजी नगर, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या सहकार्याने बौद्धिक दिव्यांगांच्या पुनर्वसन व सक्षमीकरणासाठी पालक जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा राष्ट्रीय न्यासांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे आयोजन साई संस्कार संस्थेच्या संस्थापक तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या माजी महापौर मंगला ताई कदम व विद्यमान नगरसेवक कुशाग्रदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यशाळेदरम्यान राष्ट्रीय न्यास कायद्याअंतर्गत समाविष्ट असलेल्या सेरेब्रल पाल्सी, ऑटीझम, बौद्धिक अक्षमत्व व बहुविकलांग या चार प्रकारांतील दिव्यांगांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये कायदेशीर पालकत्व, ‘निरामया’ आरोग्य विमा योजना, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारस दिव्यांग पाल्यासाठी कुटुंब निवृत्ती वेतन तसेच केंद्र व राज्य शासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजनांचा समावेश होता.

यावेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे निमवैद्यकीय अधिकारी नितीन कुलकर्णी, दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे निवृत्त महाव्यवस्थापक नंदकुमार फुले, अभिराज फाउंडेशनचे संचालक रमेश मुसुडगे, पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समुपदेशक हरिदास शिंदे, राष्ट्रीय न्यास जिल्हा स्तर समिती सदस्या भाग्यश्री मोरे, साई संस्कार संस्थेच्या व्यवस्थापक रेखा पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव पालक गुरुजी, बाबुराव अहिरे व गणेश थोरात यांच्यासह बौद्धिक दिव्यांगांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाग्यश्री मोरे यांनी केले, तर सूत्रसंचालन रेखा पवार यांनी केले. याप्रसंगी पालकांच्या विविध शंकांचे समाधान करण्यात आले. महादेव पालक गुरुजी यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.



थोडे नवीन जरा जुने