पिंपरी चिंचवड : सामर्थ्य फाउंडेशन यांच्या वतीने “सारथी संसाधन मेळावा”चे आयोजन बालकल्याण संस्था औंध येथे करण्यात आले.
सामर्थ्य फाउंडेशन हे गेल्या काही वर्षांपासून बौद्धिक दिव्यांग विशेष मुलांच्या पुनर्वसन व सर्वांगीण विकासासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. या उपक्रमाचा उद्देश विशेष मुलांना व त्यांच्या पालकांना आवश्यक असलेल्या सर्व सेवा, तज्ञ मार्गदर्शन आणि शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा होता.
या संसाधन मेळाव्यामध्ये बालरोगतज्ञ, विशेष शिक्षक, व्यवसायोपचार तज्ञ, भौतिकोपचार तज्ञ, नेत्रचिकित्सक, दंतचिकित्सक तसेच विविध डॉक्टर्स व थेरपिस्ट यांसह 25 पेक्षा अधिक तज्ञ सहभागी झाले होते. तसेच शासकीय योजना, विशेष आधार कार्ड इत्यादी संदर्भात मार्गदर्शनही देण्यात आले.
मेळाव्यात एकूण 106 बौद्धिक दिव्यांग मुलांनी सहभाग नोंदविला. एकाच छताखाली सर्व आवश्यक सेवा व तज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे सहभागी कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
या उपक्रमासाठी ICDS एकात्मिक बाल विकास सेवा, DEIC औंध सिविल हॉस्पिटल, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे, सप्तश्री फाउंडेशन तसेच बालकल्याण संस्था यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर बच्चे (महामंत्री, पिं. चिं. भाजपा), डॉ. अमनप्रीत कौर (बजाज CSR), मा. मनीषा बिरारीस (नोडल अधिकारी – CDPO), डॉ. प्रफुल कापसे (MIHM), डॉ. मीनाक्षी व डॉ. संध्या (DEIC) उपस्थित होते.
संस्थेच्या संस्थापिका डॉ. शिवानी पंडित यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेचे व्यवस्थापक सौरभ शिंदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन केले.
सामर्थ्य फाउंडेशनची टीम, अंगणवाडी सेविका व सर्व स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
