PCMC : कामगारांच्या देशव्यापी संपाला पाठिंबा देत पिंपरी चिंचवड येथे भव्य निदर्शने

 


 विविध सामाजिक व कामगार संघटनांचा सहभाग

पिंपरी चिंचवड (सलीम सय्यद) : केंद्र सरकारने कामगारांच्या प्रदीर्घ संघर्षातून निर्माण झालेले २९ कामगार कायदे कामगार संघटनांशी कोणतीही चर्चा न करता रद्द करून भांडवलदारांच्या हिताचे ४ नवीन कामगार संहिता लागू केल्या आहेत. या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशभरातील कामगार संघटनांनी दिनांक १२ फेब्रुवारी २०२० रोजी देशव्यापी संप पुकारला आहे.

या संपाला पाठिंबा दर्शवित पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या संयुक्त विद्यमाने आंबेडकर पुतळा, पिंपरी चौक येथे भव्य निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्वराज इंडिया, छावा संघटना, संभाजी ब्रिगेड, CITU, AITUC, DYFI, जनवादी महिला संघटना, लोकजागर ग्रुप तसेच नॅशनल फेडरेशन फॉर टेलिकॉम एम्प्लॉईज यांचा सहभाग होता.

या वेळी खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या:

कामगारविरोधी ४ नवीन कामगार कायदे तात्काळ रद्द करावेत

शेतकऱ्यांचे संपूर्ण व सरसकट कर्जमाफी जाहीर करावी

शेतमालाला हमीभावाचा कायदा करावा

वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून दोन पुराव्यांच्या आधारे दावे मंजूर करावेत

आशा स्वयंसेविकांचे सेवानिवृत्ती वय ६० वरून ६५ वर्षे करावे

शासन निर्णयानुसार (GR) पगार पावती द्यावी

केंद्र व राज्य शासनाचे एकत्रित व नियमित मानधन दरमहा ५ तारखेला द्यावे

वनजमीन, गायरान जमीन व देवस्थान जमीन कसणाऱ्यांच्या नावे करावी

आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन मानधनाऐवजी वेतन द्यावे

या निदर्शनात विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माकपचे शहर सचिव कॉ. सचिन, कॉ. गणेश दराडे, कॉ. सतीश नायर, लोकजागरचे डॉ. सुरेश बेरी, स्वराज इंडिया पक्षाचे मानव कांबळे, छावा संघटनेचे धनाजी येळकर पाटील, जनवादी महिला संघटनेच्या अपर्णा दराडे, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे आदींनी सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

या आंदोलनात कॉ. बाळासाहेब घस्ते, वीरभद्र स्वामी, पोंनाप्पण एस. के., राहुल शिंपले, नरेंद्र बनसोडे, मारुती भापकर, सुरेश बावनकर, ब्रह्मानंद जाधव, प्रकाश हगवणे, सुरेश भिसे, आयटकचे अनिल रोहम, सीटूचे जयप्रकाश व बगाडे तसेच इतर सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने