!-- afp header code starts here --> एमआयडीसी चिंचवड D 2, D 3 आदर्शनगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था; नागरिकांमध्ये संताप

एमआयडीसी चिंचवड D 2, D 3 आदर्शनगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था; नागरिकांमध्ये संताप

 

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील एमआयडीसी चिंचवड D 2, D 3 आदर्शनगर परिसरामध्ये मागील दहा वर्षांपासून रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली असून नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या या भागातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले असून, या ठिकाणी कोणत्याही रस्त्याच्या  दोन्ही बाजूला फुटपाथ नाहीत, रस्ते अरुंद असून वाहनांच्या पार्किंगसाठी पार्किंग तळ नाहीत.वाहतुकीदरम्यान अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्याच्या काळात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि अपघातांची शक्यता अधिक वाढते. या ठिकाणी 100 हून जास्त कारखाने, लघुउद्योग असून शाळा, महाविद्यालये आहेत. 

स्थानिक नागरिक विजय गुप्ता यांनी सांगितले की, रस्त्यांची दुरवस्था ही गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. या खराब रस्त्यांमुळे दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला असून अनेक लहान-मोठे अपघात घडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांनाही यामुळे अडचणींचा सामना करावा लागत असून औद्योगिक कामकाजावरही त्याचा परिणाम होत आहे.

याशिवाय या परिसरात पादचाऱ्यांसाठी व्यवस्थित फुटपाथची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. विशेषतः कामगार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या समस्येचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. फुटपाथ नसल्यामुळे वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होण्याबरोबरच अपघातांचा धोका वाढत आहे.

तसेच परिसरात भूमिगत गटारांची योग्य व्यवस्था नसल्यामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी साचून राहत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सांडपाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असून त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या परिसरात विद्युत सुरक्षेचे सेफ्टी ऑडिट करण्याची गरज असल्याचे विजय गुप्ता यांनी सांगितले.


एमआयडीसी चिंचवड हा औद्योगिक तसेच रहिवासी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भाग असूनही या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ पाहणी करून रस्त्यांची दुरुस्ती, पादचाऱ्यांसाठी सुरक्षित फुटपाथची उभारणी आणि भूमिगत गटारांची योग्य व्यवस्था करण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.



नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती उपाययोजना करावी, अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही विजय गुप्ता यांनी दिला आहे.

थोडे नवीन जरा जुने