पिंपरी-चिंचवडमधील एकमेव कनिष्ठ महाविद्यालय
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने नियुक्त तज्ज्ञ समितीने सन २०२४–२०२५ या कालावधीत घेतलेल्या राज्यस्तरीय मूल्यांकन प्रक्रियेत महाराष्ट्रातील ४२९ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना ‘अ प्लस +’ श्रेणी बहाल करण्यात आली आहे. या यादीत पिंपरी-चिंचवड शहरातून चिंचवड येथील प्रतिभा ज्युनिअर कॉलेज या स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयाचा एकमेव समावेश झाला आहे.
राज्यातील तब्बल १,०२,६७५ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे अत्यंत काटेकोर मूल्यमापन करण्यात आले. शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय कार्यक्षमता, विद्यार्थी प्रगती, नवोपक्रम, पायाभूत सुविधा, शिक्षकांची गुणवत्ता, सामाजिक जबाबदारी अशा विविध निकषांवर छाननी करून पुढील फेरीसाठी निवड झालेल्या संस्थांमधून केवळ ४२९ संस्थांना ‘अ प्लस +’ श्रेणी प्रदान करण्यात आली.
या गौरवशाली यादीत पुणे परिसरातील चिंचवड येथील प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचा समावेश होणे ही केवळ संस्थेसाठीच नव्हे, तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसरासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब ठरली आहे. या यशामुळे महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे.
या यशामागे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे समर्पित कार्य, प्रशासकीय कर्मचारीवर्गाची मेहनत, विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण प्रगती तसेच पालकांचा सक्रिय सहभाग यांचा मोलाचा वाटा आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धती यांच्या जोरावर संस्थेने राज्यपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ही घवघवीत कामगिरी भविष्यातील शैक्षणिक प्रगतीसाठी भक्कम पायाभरणी ठरेल, तसेच येत्या काळातही महाविद्यालय शैक्षणिक उत्कृष्टतेचा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी व्यक्त केला आहे.
या यशानिमित्त सचिव डॉ. दीपक शहा, संचालक डॉ. तेजल शाह, खजिनदार डॉ. भूपाली शाह यांनी प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सहकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

