PCMC : “सौंदर्यापेक्षा संस्कार महत्त्वाचे” — व्याख्यात्या अँड. वृषाली इंगळे-पाटील


पिंपरी चिंचवड (सलीम सय्यद) : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक सचिव दीपक शहा यांचे प्रोत्साहन व मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मोहननगर परिसरातून शिवज्योत, ढोल-लेझीम व ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत भव्य मिरवणूक काढली. मिरवणूक महाविद्यालयाच्या प्रांगणात आल्यानंतर तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

शिवरायांच्या भव्य मूर्तीचे पूजन व आरती सोलापूर येथील व्याख्यात्या अँड. वृषाली इंगळे-पाटील यांच्या हस्ते पार पडली. यावेळी प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, संयोजक डॉ. रोहित आकोलकर, डॉ. अमोल शिंदे, प्रा. सुकलाल कुंभार, प्रा. सुप्रिया गायकवाड, प्रा. ज्योती इंगळे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी वृषाली लाटे व प्रथमेश गलवाड आदी उपस्थित होते.

“छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण” या विषयावर अँड. वृषाली इंगळे-पाटील यांनी प्रेरणादायी व्याख्यान दिले. विद्यार्थ्यांनी ‘स्वराज्याची पहाट’ हे लघुनाट्य, ‘शिवजन्म पाळणा’ हे नृत्य तसेच पोवाड्याचे सादरीकरण विद्यार्थी गौरव कालेकर व सहकाऱ्यांनी केले. श्री गणेश व्यायाम मंडळ व ब्रह्मसिंह गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी तलवारबाजी, दांडपट्टा आदी मर्दानी खेळांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.

व्याख्यानाच्या प्रारंभी अँड. इंगळे-पाटील यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना सामूहिक शपथ दिली — “मी माझ्या आयुष्यात कधीही व्यसन करणार नाही आणि प्रत्येक स्त्रीचा आदर करेन.” पुढे शिवचरित्रावर भाष्य करताना त्यांनी मुलींना धैर्यशील बनण्याचे आवाहन केले. आई-वडील व कुटुंबीयांचा आदर राखणे, तसेच त्यांचे नाव कमी होईल असे कृत्य टाळणे, असे त्यांनी तरुणांना बजावले.

आजच्या युवकांसमोर बेरोजगारी, प्रदूषण यांसारखी गंभीर आव्हाने असून त्यावर उपाय शोधण्यासाठी विचारपूर्वक नेतृत्व घडविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चुकीचा इतिहास मांडला जात असल्यास त्याविरोधात आवाज उठवावा, असेही त्यांनी नमूद केले. शिवचरित्रातील स्वाभिमान, धैर्य, स्त्रीला मातेसमान वागणूक देणे हे गुण आत्मसात करून संस्कार जपण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी प्रस्ताविकात सांगितले की, संस्थेतील विद्यार्थी अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा, बहीःशालेय उपक्रम व एन.एस.एस.च्या माध्यमातून स्वतःला घडवत आहेत. अशा उपक्रमांतूनच उद्याचे सक्षम नेतृत्व तयार होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व व नेतृत्व पुढील अनेक वर्षे प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी सानिका गाढवे व निहाल बागल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रथमेश गलवाडे, वृषाली लाटे, विराज काशीद, ओम जगताप, प्रतीक गावडे, जानवी धायगुडे, करिष्मा ठाकरे, अनिकेत जगदाळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.


थोडे नवीन जरा जुने