PCMC : कृष्णानगरमध्ये स्पाईन रोडवरील अतिक्रमणावर धडक कारवाई; पीसीएमसीचा कडक इशारा


पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका च्या फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पेठ क्रमांक १९, कृष्णानगर येथील स्पाईन रोडच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर मंगळवार, दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजताच धडक कारवाई करण्यात आली. वाहतूक कोंडी, पादचारी मार्गाचा अडथळा आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

गेल्या काही महिन्यांपासून स्पाईन रोडच्या मधोमध अनधिकृतपणे उभारलेली दुकाने, विशेषतः मांस व मच्छी विक्री करणारे स्टॉल्स तसेच इतर किरकोळ व्यवसायांची वाढ मोठ्या प्रमाणावर झाली होती. यामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानंतर फ क्षेत्रीय कार्यालयाने परिस्थितीची पाहणी करून नियोजनबद्ध मोहीम राबवली.


कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिकेच्या अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग व आरोग्य विभागाच्या पथकांनी संयुक्तपणे ही मोहीम पार पाडली. अनधिकृत स्टॉल्स, पत्र्याची शेड्स, हातगाड्या आणि इतर बांधकामे हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.

प्रशासनाच्या माहितीनुसार, संबंधितांना पूर्वसूचना देण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी पुन्हा अतिक्रमण करण्यात आल्याने कठोर पाऊल उचलावे लागले. “सार्वजनिक रस्ते व मोकळ्या जागांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण सहन केले जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढील काळातही कारवाई सुरूच राहील,” असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला.

दरम्यान, काही व्यावसायिकांनी उपजीविकेचा प्रश्न उपस्थित करत पर्यायी जागेची मागणी केली. यावर प्रशासनाने नियमांच्या चौकटीत राहून योग्य तो तोडगा काढण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. मात्र सार्वजनिक सुरक्षेला बाधा आणणाऱ्या अतिक्रमणांवर कोणतीही तडजोड होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या कारवाईमुळे स्पाईन रोडवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून परिसरातील नागरिकांनीही प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. भविष्यात अशा अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी नियमित पाहणी व कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्धार महापालिकेने व्यक्त केला आहे.

थोडे नवीन जरा जुने