निरोगी जीवनासाठी नैसर्गिक बॉडी बिल्डिंग महत्त्वाची - महापौर लांडगे


                                                                            
पिंपरी चिंचवडमध्ये महापौर चषक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेला उत्साहात सुरुवात, विविध राज्यातील ४९५ हुन अधिक खेळाडू सहभागी

पिंपरी चिंचवड : शरीरसौष्ठव घडवताना स्टिरॉइड्ससारख्या औषधांचे सेवन करून कृत्रिम पद्धतीने शरीर बनवण्याच्या ऐवजी तरुणांनी नैसर्गिक बॉडी बिल्डिंगकडे लक्ष देत आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अवलंब करावा, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्तविद्यमाने व पिंपरी चिंचवड अमेच्यूर बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने 'महापौर चषक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६' चे आयोजन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे,नगरसदस्य धर्मपाल तंतरपाळे,शितल शिंदे, मंदार देशपांडे, नगरसदस्या अर्चना सस्ते यांच्यासह इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे डॉ. संजय मोरे, राजेश सावंत, अ‍ॅड. सचिन रणदिवे, महापालिकेचे उपायुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह स्पर्धक आणि नागरिक उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले, 'तरुणांनी आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य देत नैसर्गिक पद्धतीने शरीरसौष्ठव घडवण्यावर भर द्यावा. आरोग्य हीच खरी संपत्ती असून इतर सर्व संपत्तीपेक्षा ती अधिक महत्त्वाची आहे. पैसा, प्रतिष्ठा आणि इतर गोष्टी आयुष्यात पुन्हा मिळू शकतात; मात्र एकदा आरोग्य बिघडले तर ते पूर्ववत करणे कठीण असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शरीरावर प्रेम करत नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि संयम यांचा अवलंब करून नैसर्गिक बॉडी बिल्डिंगकडे लक्ष द्यावे,' असे देखील त्यांनी सांगितले.

प्रत्येक खेळाडू जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो आणि स्वतःला ओळखून आनंदाने आयुष्य जगतो. त्यामुळे तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली रुजवण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात, असे देखील महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.

भाऊसाहेब भोईर म्हणाले, 'वयाची पहिले पंचवीस वर्षे आम्ही स्वतःवर, व्यायामावर प्रेम केल्याने आज लोक आमच्यावर प्रेम करतात. प्रशासनाने ही स्पर्धा कमी वेळात आयोजित केली, त्याबद्दल त्यांचे कौतुक करतो. अशा स्पर्धा पिंपरी चिंचवड शहरातील तरुणांना प्रेरणादायी ठराव्यात, यासाठी या स्पर्धेला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.'

कैलास कुटे म्हणाले, 'प्रत्येकाने शरीरस्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शरीर चांगले ठेवण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. अशा कार्यक्रमात पिंपरी चिंचवड शहरातील सर्व खेळाडूंचा सहभाग असणे गरजेचे आहे. अशा स्पर्धांमुळे तरुणांना प्रोत्साहन मिळत असते,' असे देखील ते म्हणाले.

डॉ. संजय मोरे म्हणाले, या स्पर्धेत २३ लाखांची रोख बक्षिसे दिली जात आहेत. स्पर्धा घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेले सहकार्य निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. आगामी काळात आशियाई स्पर्धांचे पिंपरी चिंचवड शहरात आयोजन करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा अशा स्पर्धेमुळे पिंपरी चिंचवड शहरातील तरुण स्वतःवर व व्यायामावर प्रेम करतील.'

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त पंकज पाटील यांनी, सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार शितल शिंदे यांनी मानले.

विविध राज्यातील ४९५ हुन अधिक खेळाडू सहभागी

महापौर चषक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६ मध्ये महाराष्ट्र सह जम्मू-काश्मीर, केरळ, उत्तर प्रदेश , आसाम पश्चिम बंगाल अशा विविध राज्यातून ४४५ पुरुष व ५० महिला स्पर्धेक सहभागी झाल्या आहेत. २९ व ३० मार्च २०२६ असे दोन दिवस ही स्पर्धा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेला उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.                                                                                                                           

थोडे नवीन जरा जुने