आळंदी येथील महाराष्ट्रातील राज्यव्यापी बैठकीत सर्व संघटना पदाधिकारी यांनी घेतला निर्णय
आळंदी (पुणे) : महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांच्या प्रलंबित मागण्या, अनधिकृत बाईक टॅक्सींचा विनापरवाना सुळसुळाट आणि ‘चालक कल्याणकारी महामंडळ’ स्थापन करण्याच्या मागणीसाठी आळंदी (पुणे) येथील समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाला, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक राज्यव्यापी संयुक्त बैठक पार पडली. ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत एक महत्त्वपूर्ण व आक्रमक निर्णय घेण्यात आला असून, आगामी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा, टॅक्सी व कॅब चालक-मालक संपूर्ण राज्यभरात एकाच दिवशी संपावर जाणार असल्याची अधिकृत घोषणा डॉ. बाबा कांबळे यांनी केली आहे.
या भव्य बैठकीस मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, सांगली, कराड, इचलकरंजी, सातारा, कोल्हापूर, नंदुरबार, नागपूर, अकोला, चंद्रपूर यांसारख्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून तसेच शेजारील कर्नाटक राज्यासह देश-राज्यातील विविध भागांतून ऑटोरिक्षा, टॅक्सी व कॅब युनियनचे प्रमुख पदाधिकारी, कायदेशीर सल्लेगार, प्रतिनिधी आणि हजारो चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय, उच्च तंत्रशिक्षण मंत्री यांच्यासह अनेक मान्यवर व विविध संघटनांचे प्रतिनिधी या ऐतिहासिक बैठकीत सहभागी झाले होते.
बैठकीतील प्रमुख व ज्वलंत मुद्दे आणि मागण्या:
अनधिकृत बाईक टॅक्सींवर पूर्ण बंदी: महाराष्ट्रात विनापरवाना व बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या दुचाकी (बाईक) टॅक्सींवर तातडीने पूर्ण बंदी घालण्यात यावी आणि मोटार वाहन कायद्यानुसार संबंधित ऑनलाइन ॲप कंपन्यांवर कठोर फौजदारी व दंडात्मक कारवाई करावी.
कल्याणकारी महामंडळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी: शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या ‘ऑटोरिक्षा-टॅक्सी-कॅब चालक-मालक कल्याणकारी महामंडळा’ची स्थापना आणि त्यासाठी आवश्यक बजेट तरतूद कागदावरच असून त्याची तातडीने प्रत्यक्ष अंमलबजावणी करून चालकांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा कवच द्यावे.
वाहतूक विभागाचे नियम व इतर प्रश्न: चालकांच्या परवाना नूतनीकरण, फिटनेस पासिंगमधील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करणे आणि सुरक्षित पार्किंग स्टँड उपलब्ध करून देणे यांसारख्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अनधिकृत बाईक टॅक्सी, ऑनलाइन ॲप कंपन्यांची मनमानी आणि प्रशासकीय अनास्थेमुळे राज्यातील लाखो चालक-मालक आर्थिक व मानसिक विवंचनेत जीवन जगत आहेत. या अन्यायाविरुद्ध आणि आपल्या हक्कांचे व अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी शासनाला धारेवर धरण्याकरिता २३ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचा संप पुकारला जाणार आहे. या संपात सर्व चालक-मालक व युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा लढा यशस्वी करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
डॉ. बाबा कांबळे
मो. ९८५०७३२४२४
(राष्ट्रीय अध्यक्ष, ऑटोरिक्षा टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया; संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत; तथा संस्थापक, ऑटो टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य)


