स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक सोहळा; १५ व १६ नोव्हेंबरला विविध धार्मिक कार्यक्रम
महाराष्ट्र जनभूमी न्यूज वार्ताहर : शिवानंद चौगुले
मोशी : सूर्योपासना, श्रद्धा, भक्ती, पावित्र्य आणि भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या छठ महापर्वानिमित्त मोशी येथील पवित्र इंद्रायणी नदी घाटावर भव्य छठ महापूजा आणि माँ गंगा आरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विश्व श्रीराम सेना सामाजिक संघटना, भारत यांच्या वतीने आयोजित या धार्मिक सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे श्रीराम जन्मभूमी न्यास, अयोध्या येथील महासचिव तथा श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास, मथुरा येथील उपाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारी भव्य माँ गंगा आरती. तसेच महामंडलेश्वर स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.
छठ महापर्वाच्या निमित्ताने अस्ताला जाणाऱ्या सूर्यनारायणाला सायंकाळी अर्घ्य अर्पण करणे, छठी मातेची विधिवत पूजा-अर्चना, भक्तिमय वातावरणात माँ गंगा आरती आणि दुसऱ्या दिवशी उगवत्या सूर्यदेवाला प्रातःकाळी अर्घ्य अर्पण असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
कार्यक्रमाचे वेळापत्रक :
रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ : सायंकाळी ५ वाजता अस्ताचलगामी सूर्यदेवाला अर्घ्य व माँ गंगा आरती.
सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ सकाळी ५:०० वाजता उदीयमान सूर्यदेवाला अर्घ्य व छठ महापर्वाची सांगता.
स्थळ : पवित्र इंद्रायणी नदी घाट, मोशी, पिंपरी-चिंचवड.
या धार्मिक सोहळ्याच्या आयोजनासाठी विश्व श्रीराम सेना छठ पूजा समिती कार्यरत असून, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. लालबाबू अंबिकालाल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. विविध मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे.
छठ महापर्व हे केवळ धार्मिक व्रत नसून निसर्ग, जल, सूर्य आणि मानव यांच्यातील नात्याची जाणीव करून देणारा भारतीय संस्कृतीतील महत्त्वपूर्ण उत्सव आहे. सूर्यदेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना कुटुंबाचे आरोग्य, सुख-समृद्धी आणि समाजाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, सांस्कृतिक परंपरा आणि धार्मिक एकात्मतेचा संदेशही दिला जातो.
मोशी आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व भाविक, नागरिक आणि कुटुंबीयांनी या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होऊन छठी माता व सूर्यनारायणाचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
