जुन्नर (रफिक शेख) : जुन्नर तालुक्यात पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जुन्नर तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाठ यांच्याकडून करण्यात आले आहे.
तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, जुन्नर यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून इंधन पंपांवर गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र तालुक्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जास्त प्रमाणात साठा करण्याची गरज नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात तहसीलदार बाळासाहेब शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली गॅस एजन्सी वितरकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील इंधनपुरवठा सुरळीत असल्याची माहिती देण्यात आली. तसेच गॅस कंपन्यांकडून घरगुती एलपीजी सिलेंडरचे ऑनलाइन बुकिंग व वितरण नियमितपणे सुरू असल्याचे सांगण्यात आले.
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहनांसाठी आवश्यक तेवढेच पेट्रोल किंवा डिझेल भरावे. अनावश्यक गर्दी करून साठा करण्याचा प्रयत्न करू नये. तसेच गॅस सिलेंडर घेताना ओटीपी देणे किंवा इतर प्रक्रियेत सतर्क राहण्याचेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सींची अचानक तपासणी करण्यात येत असून आवश्यक त्या ठिकाणी पथके स्थापन करून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार घरगुती एलपीजी सिलेंडरचा इतर कारणांसाठी वापर होऊ नये, यासाठीही नियमित तपासणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
घरगुती गॅसचा साठा करून ठेवणे अथवा काळाबाजार करण्याचा प्रयत्न करू नये, असेही नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास किंवा तक्रार असल्यास संबंधित प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
