- शहरातील सोसायटीधारकांना पाण्याच्या खर्चाची भरपाई द्या
- सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांची मागण
पिंपरी चिंचवड : शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र मिळवताना दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. 2016 नंतर शहरात उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पांमध्ये भामा-आसखेड टप्पा क्रमांक 5 व 6 पूर्ण होईपर्यंत सदनिकाधारकांना स्वखर्चाने पाणीपुरवठा करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात एकाही विकसकाने ही जबाबदारी पार पाडलेली नसल्याचे समोर आले आहे.
पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी याबाबत महानगरपालिकेकडे तक्रार केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, महानगरपालिकेकडे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने विकसकांकडून हमीपत्र घेऊनच प्रकल्पांना पूर्णत्व दाखले देण्यात आले. मात्र या हमीपत्रानुसार पाणीपुरवठा करण्यास बांधकाम व्यावसायिकांनी टाळाटाळ केली आहे.
यामुळे शहरातील हजारो सोसायटीधारकांना पाणी विकत घ्यावे लागत असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विकसकांवर भारतीय दंड संहितेनुसार गुन्हे दाखल करावेत, तसेच सोसायटीधारकांनी आजपर्यंत केलेल्या पाण्याच्या खर्चाची भरपाई करून द्यावी, अशी मागणी फेडरेशनकडून करण्यात आली आहे.
याशिवाय, जे बांधकाम व्यावसायिक हमीपत्राचे पालन करणार नाहीत त्यांना भविष्यात बांधकाम परवानगी किंवा पूर्णत्व प्रमाणपत्र देऊ नये, अशीही मागणी करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत यापूर्वी अनेक बैठका घेऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी नाराजी व्यक्त करत नव्याने नियुक्त आयुक्तांकडून या प्रकरणात कठोर भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
प्रतिक्रिया :
“पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी महानगरपालिकेला दिलेल्या हमीपत्राचा सर्रास भंग केला आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची स्पष्ट जबाबदारी असूनही ती पार पाडलेली नाही. यामुळे सोसायटीधारकांना स्वतःच्या खर्चाने पाणी विकत घ्यावे लागत असून त्यांचा आर्थिक ताण वाढला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून संबंधित विकसकांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि नागरिकांना झालेल्या खर्चाची परतफेड करून द्यावी, ही आमची ठाम मागणी आहे.”
- संजीवन सांगळे, अध्यक्ष, सोसायटी फेडरेशन.
